पहूर येथे भरवस्तीत धाडसी घरफोडी; पोलिसांसमोर आव्हान

0

पहूर। पहूरपेठ येथील रहिवासी तसेच ठाणे येथे जिल्हा मुद्रांक अधिकारी म्हणून कार्यरत असलेले यांच्या बंद घरावर अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून धूम स्टाईल घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली असून चोरट्यांनी 1 क्विंटल वजनाची तिजोरी लंपास केली असून त्यात 26 तोळे 3 ग्रॅम सोन्याचे दागिने होते. सुमारे 5 लाख 11 हजार रूपये किमतीच्या या दागिन्यांसह चोरट्यांनी पोबारा केला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी घडली नाही. भरवस्तीत सोमवारी रात्री तीनच्या सुमारास सदर घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली असून पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सुदैवाने वाचले विकासचे प्राण
मध्यरात्री तीनच्या सुमारास निळे व लाल रंगाच्या स्पोटर्स दुचाकींवरून पाच अज्ञात चोरटे घराजवळ आले. तीन जणांनी घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला तर दोघे बाहेरच पाळत ठेवत होते. असे या घटनेचे प्रत्यक्षदर्शी विकास पांडूरंग पाटील यांनी सांगितले. विकास रात्री गल्लीतच नेहमीप्रमाणे झोपलेला होता. त्याच्यासमोर हा प्रकार घडत असतांना तो काहीही करू शकला नाही. कारण त्याच्या खाटेजवळच एक जण लाकडी दंडूका घेऊन उभा होता. यात विकासने काही हालचाल करण्याचा प्रयत्न केला असता तर चोरट्यांनी आपल्यावर जीवित हल्ला केला असता असे प्रतिनिधींशी बोलतांना त्याने सांगितले. तो अंगावर गोधडी घेऊन सर्व प्रकार टिपत होता.

पोलिसांची घटनास्थळी धाव
घटनेची खबर मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दिपक पाटील यांचे मोठे भाऊ अशोक पाटील व आजुबाजूचे लोकही धावून आले. सहायक पोलिस निरीक्षक मोहन बोरसे, उपनिरीक्षक शिवाजी नागवे, उपनिरीक्षक सुनिल कदम घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात ते अपयशी ठरले. सकाळी 11 वा. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक कपोलिस निरीक्षक रवींद्र बागुल, युनुस शेख, शरीफ काझी, रवींद्र पाटील यांनीही माहिती घेऊन गुन्हेगारांना पकडण्याचे आश्‍वासन दिले. दरम्यान घटनास्थळी पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी केशव पातोंड यांनी भेट दिली. तसेच श्‍वान पथकातील हप्पी नामक श्‍वानाने घटनास्थळपासून पहूरकडे येणार्‍या रस्त्यावर चोरट्यांनी तिजोरीवरील फेकलेल्या पट्टीपर्यंत येऊन श्‍वान थांबला. त्याने पट्टीचा वास घेऊन हरीदास पांढरे यांच्या शेतापर्यंत रस्ता दाखविला. संदीप पाटील व मनोज पाटील यांनी श्‍वान पथक घेऊन हजर झाले होते. ठसे तज्ञ राजेंद्र महाजन यांनी घटनास्थळी भेट घेऊन अस्ताव्यस्त झालेले साहित्य व इतर वस्तुंची पाहणी केली. दोन ठसे संशयास्पद असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.