धुळे । धुळ्याची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणारी पांझरा नदीचे दैन्य आता मिटणार आहे. अस्वच्छतेच्या विळख्यात सापडलेल्या या नदीच्या स्वच्छतेसाठी प्रस्तावित असलेल्या साडे सातकोटींच्या पाईप लाईनला पर्यावरण खात्याने आणि मुख्यमंत्र्यांनी मंजूरी दिली असल्याची माहिती धुळ्याचे आ.अनिल गोटे यांनी दिली आहे. शहराच्या मध्यभागातून वाहणार्या पांझरानदीचे स्वरुप डबके झाले असून ही नदी पर्यावरणमुक्त तसेच बारमाही वाहण्यासाठी या नदीत सोडण्यात येणारे घाणपाणी रोखण्यासाठी हा निधी वापरला जाणार असल्याचे आ. गोटे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
नाल्याचे आलेय स्वरूप
पत्रकात म्हटले आहे की, शहराच्या मध्यभागातून वाहणार्या पांझरा नदीचे स्वरुप हे शहरातील घाण वाहून नेणारा एक मोठा नाला असे झाले आहे. नदी या पवित्र शब्दाशी जोडणारे या नदीचे स्वरुप राहिलेले नाही. तर मनपात सत्तारुढ पक्षाला याच्याशी काही देणे-घेणे नाही. परिणामी, धुळे शहर हे इलेक्ट्रिफाईड खेडे झाले आहे. शहरातील सर्व घाणपाणी वाहून नेण्यासाठी कुठलीही योजना कार्यान्वित न झाल्याने ही सर्व घाण पांझरानदीत आणून सोडली जाते. परिणामी, नदीकाठी राहणार्या लोकांना या तुंबलेल्या घाणीमुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.
भूमिगत पाईपलाईन
पांझरानदीच्या दोन्ही काठावर 70 फूट रुंदीचे साडेपाच किमी लांबीचे रस्ते 75 कोटी 16 लाख रुपये खर्चुन बांधावयाचे आहेत. गटारीचे पाणी रस्त्यावर येवून या रस्त्यांची अवस्था दयनीय होवू नये म्हणून देवपूर व शहर भागाकडून दोन स्वतंत्र भूमिगत पाईपलाईन काढून ही सर्व घाण या भूमिगत गटारातून शहराबाहेर नेण्याचे व तेथे जलशुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला होता. 7 कोटी 52 लाखांच्या या प्रकल्पास शासनाच्या पर्यावरण विभागाने व मुख्यमंत्र्यांनी मंजूरी दिली असून या योजनेमुळे पांझरा नदी केवळ घाणमुक्तच होणार नाही तर बारमाही प्रवाहीत राहील, असेही आ.गोटे यांनी म्हटले आहे.
पाण्याचा साठा बारमाही!
येत्या वर्षभरात पांझरानदीवर अजून दोन पाईपमोर्या करण्यात येणार असून हत्तीडोहाच्याजवळ पूर्ण उंचीचा पूल, मार्केट कमिटीचे पॉलिटेक्निक कॉलेज यांना जोडणारा दोन कि.मी.लांबीचा 72 फूट रुंदीचा मार्ग उभारणे. आजमितीस अस्तित्वात असलेल्या गवळीवाड्यासमोरील ब्रिज कम बंधारा नव्याने होत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग कनेक्टिव्हीटी पारोळारोड ते नॅशनल हायवे तीन या प्रकल्पासाठी ना.गडकरी यांनी मंजूर केलेल्या 15 कोटींच्या निधीतून ब्रिज कम बंधारा साकारला जाणार आहे. पांझरा नदीपात्रात एकूण 4 ठिकाणी किमान 12 फूट उंचीचे व दीड किमी लांबीचा पाण्याचा साठा बारमाही राहील, असे या योजनेचे स्वरुप आहे. लवकरच या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करुन येत्या सहा महिन्यात हे काम पूर्ण करण्याचा मनोदय असल्याचे आ.अनिल गोटे यांनी म्हटले आहे.