शिंदखेडा : शिंदखेडा तालुक्यातील बेटावद गावाजवळून वाहणार्या पांझरा नदीतून वाळूचा बेकायदेशीर उपसा होत असून स्थानिक यंत्रणेला कळवूनही ते कारवाई करीत नसल्याने आता जिल्हाधिकार्यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी बेटावद येथील अॅड.वसंतराव पवार यांनी केली आहे. या बेकायदेशीर वाळू उपशाची बेटावद गावात उपहासात्मक चर्चा होत असून अल्पदरात आठवड्यातील दोन दिवस वाळू मिळेल, असा जाहीर फलकच लावण्यात आला आहे. यात फलक लावणार्यांनी ही वाळू नेमकी कोणाकडे मिळेल याचे नावही फलकावर लिहीले असल्याने पांझरेतून बेकायेदशीर वाळू उपसा कोण करीत आहे हे संपूर्ण गावाला ठाऊक झाले आहे. शिवाय फलकावरील हा मजकूर सोशल मिडीयावर देखील वायरल झाल्याने प्रशासनाची नाचक्की होत आहे.
रात्रीच्या वेळी केला जातो उपसा
शिंदखेडा तालुक्यातील बेटावद गावाजवळून पांझरा नदी वाहते या ठिकाणी निळकंठेश्वर नावाचा भाग असून तेथे वाळूचा मुबलक साठा आहे. या ठिकाणाहून वाळू उपसा करण्याचा कुठलाही ठेका शासनपातळीवर दिला गेला नसला तरी वाळू उपसा मात्र सातत्याने होत आहे. याचाच अर्थ हा वाळू उपसा बेकायदेशीर आहे. दिवसा या वाळू उपशाला स्थानिकांचा
विरोध होईल ही बाब लक्षात घेवून रात्री १० ते पहाटे ३ या वेळात वाळू उपसा करुन त्याची वाहतूक होत आहे. यासंदर्भात शिंदखेडा तहसीलदार गायत्री सैंदाणे यांना वेळोवेळी खबर देवून तसेच रात्रीच्या वेळी होत असलेल्या वाळू उपशाची माहिती देवूनही कारवाई होत नाही. यावर गावकर्यांनी नामी शक्कल काढली आहे.
त्या फलकाचा मास्टरमाईंड कोण?
बाजारपेठेतील एका सुचना फलकावर वाळूचे भाव गडगडले, वाळू ट्रिप ट्रॅक्टर ५०० रुपये, मुरुम ५५० रुपये असा मजकूर लिहून ही वाळू कोण पुरवेल? त्यांचे नाव आणि संपर्क नंबर दिले आहेत. यावरुन वाळू उपसा कोण करत आहे? हे सर्वांना माहित आहे. गेल्या १९ नोव्हेंबरला लावलेल्या या बोर्डाची गावात जोरदार चर्चा झाली. शिवाय हा मजकूर सोशल मिडीयावर देखील वायरल करण्यात आला. दस्तुरखुद्द तहसीलदारांना तो त्यांच्या व्हॉट्सअप नंबरवर पाठविण्यात आला. मात्र यात अर्थकारण होत असल्याने कारवाई टाळली जात आहे. तेव्हा जिल्हाधिकारी म्हणून आपणच यात लक्ष घालावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.