पांझरेतून आवर्तन न सोडल्यास घेराव घालणार

0

धुळे । उन्हाने तीव्रतेचा उच्चांक गाठला असून 44 अंश सेल्सीअसपर्यंत तापमान वाढले आहे. ग्रामीण भागात माणसं आणि जनावरांना पाण्याची टंचाई भासत असून अक्कलपाडा धरणातून 15 एप्रिलपासून आर्वतनाची मागणी सुरु आहे. मात्र धुळे पाटबंधारे विभागाने ग्रामपंचायतींकडून पाणीपट्टी म्हणून थकबाकी पोटी 80 लाखाची मागणी केली आहे. त्यामुळे एकही आर्वतन न सुटल्याने पांझरा काठावरील गावांत संतापाची लाट पसरली आहे. येत्या 7 तारखेपर्यंत पांझरेतून आर्वतन न सुटल्यास धुळे जिल्हाधिकार्‍यांना कोणत्याही क्षणी घेराव घालून पाणी सुटेपर्यंत ग्रामस्थांसह दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा जाहीर इशारा शिवसेनेचे माजी आ.प्रा.शरद पाटील यांनी दिला आहे.

दुर्लक्षामुळे लांबले आवर्तन
अक्कलपाडा धरणाखालील पांझरा पात्रात धुळे, शिंदखेडा व अमळनेर तालुक्याच्या 86 गावांच्या नळ पाणी योजना अवलंबून आहेत. अक्कलपाडा धरणातून 200 दलघफू जलसाठा विसर्जित करुन पांझरा पात्राखालील 86 गावांना पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद न पडू देण्यासाठी दोन आर्वतने 15 एप्रील व 15 मे रोजी सोडणे आवश्यक होते. मात्र धुळे पाटबंधारे विभाग, पाणी पुरवठा विभाग (जिल्हा परिषद, धुळे), पाणी पुरवठा विभाग (जि.प. जळगांव), तसेच तहसिलदार धुळे तालुका, शिंदखेडा तालुका व अमळनेर तालुका आणि गटविकास अधिकारी धुळे (पं.स), शिंदखेडा(पं.स.) व अमळेनर (पं.स.) यांनी तसेच जिल्हाधिकारी, धुळे व मनपा आयुक्त, धुळे यांनी याबाबतीत दुर्लक्ष केल्याने आर्वतन लांबले आहे. सद्या धुळे, शिंदखेडा व अमळनेर तालुक्यात उष्णतेची तिव्र लाट असून शेतावरील विहीरी कोरड्या पडल्या आहेत. पाणी पांझरा पात्रात आल्यास ही तिव्रता कमी होऊन या पाण्याचा लाभ मिळेल. कापूस लागवडीस मदत होऊन टंचाई संपुष्टात येईल.

1500 दलघफु जलसाठा
सद्या अक्कलपाडा धरणांत सुमारे 1500 दलघफु जलसाठ्यापैकी 200 दलघफु जलसाठा उजव्या कालव्याद्वारे नकाणे तलावासाठी सोडण्यात आला आहे. याचाही फायदा उजव्या कालव्यालगतच्या शेतकर्‍यांना होत आहे. दोन्ही आर्वतने दिल्यानंतरही अक्कलपाड्यात800 दलघफु जलसाठा मे अखेरपर्यंत शिल्लक राहणार आहे. याचीही कल्पना माजी आ. प्रा. शरद पाटील यांनी तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांना भेटून दिली होती. मात्र, पाटबंधारे विभागाचे पाणी पट्टीचे थकीत पैसे भरण्याचा आग्रह धरल्याने आर्वतन लांबले आहे. अक्कलपाडा धरणातील पांझरा पात्रातील आर्वतनाचा लाभ धुळे महानगरपालिकेच्या हनुमान टेकडी, पंपीग स्टेशनलाही होतो तसेच धुळे मनपा हद्दीत वलवाडी, महिंदळे नकाणे, बाळापूर, वरखेडे ही गांवे समाविष्ट झाल्याने या गावांच्या नळ पाणी पुरवठा योजनांही पांझरा पात्रातील पाण्याचा लाभ होतो. त्यामुळे धुळे मनपाने आर्वतनासाठी पैसे भरणे आवश्यक आहे. मात्र पाटबंधारे विभागाने त्यांना याबाबत नोटीस बजावलेली नाही. पाणी पट्टीचे पैसे ग्रामपंचायतीकडून वसुल करण्याची जबाबदारी संबंधीत गटविकास अधिकार्‍यावर असल्याने पंचायतींना मिळाणार्‍या वित्त आयोगाच्या अनुदानातून परस्पर कपात करणे शक्य होते, मात्र पाणी या विषयावर संपुर्ण प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने आर्वतन लांबत आहे. सद्या पांझरेतून 300 दलघफु विसर्जन दिल्यास मृतसाठा धरुन 800 दलघफु पेक्षा जास्त पाणी धरणांत शिल्लक राहणार आहे.