जळगाव । पेट्रोल भरण्यासाठीच्या यंत्रामध्ये एक चीप बसवून त्याद्वारे पेट्रोल चोरी करणार्या गँगचा ठाणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच उलगडा केला होता. या चीपमुळे राज्यातील अनेक पेट्रोल पंपावर ग्राहकांच्या हक्काचं पेट्रोल व किंवा डिझेल पूर्ण पैसे भरूनही त्यांना मिळत नव्हतं. अशा पेट्रोल पंपावर ठाण्याच्या क्राईम ब्रान्च शाखेने राज्यव्यापी कारवाई सुरू केली आहे. तर या कारवाई अंतर्गत सोमवारी सकाळीच शहरातील पांडे चौक परिसरातील लक्ष्मीकांत चौधरी यांच्या अमन ऑटो इंडियन ऑईल या पेट्रोल पंपावर ठाणे क्राईम ब्रॉन्च, भारत पेट्रोलियम व वजनमाप विभागाने कारवाई करून तब्बल साडे चार तास तपासणी केली. तपासाअंती पेट्रोलपंपामधील एका युनिटमधील मशिनमध्ये तफावत आढळून आल्याने त्या मशिनमधील कंट्रोलकार्ड, पल्सर चीप, कि-बोर्ड तपासणीसाठी पथकाने ताब्यात घेतले आहे. तर मनिशनवर सीलबंदची कारवाई करण्यात आली आहे.तसेच दुपारी शहरातील मोहाडी रोडवरील भारत पेट्रोलियमच्या पंपाची देखील तपासणी करण्यात आली.
यंत्रांची तीन तास तपासणी
ठाणे क्राईम ब्रान्च पथकातील पोलिस निरीक्षक संजू जॉन यांनी पेट्रोलपंपावर छापा मारल्यानंतर संकाळी 8.45 वाजेपासून इंधन वितरण करणार्या पंपावरील तिनही युनिटच्या मशिनांची तपासणी करण्यात आली. यावेळी प्रत्येक मशीनमधून पाच लिटर पेट्रोल झिरो सेट केल्यानंतर काढण्यात आले. एका मशीनमधून पाच लिटर पेट्रोल काढल्यानंतर पाच लिटर पेट्रोलमध्ये 25 मिली किमी भरले. त्यानंतर दोन ते तीन मशिन तपासल्यानंतर यातही 20 व 25 पाच लिटरमध्ये किमी भरले. अखेर शेवटचे युनिटमधील मशिन तपासणी केल्यानंतर पथकाला पाच लिटर पेट्रोलमध्ये चक्क 40 मिली पेट्रोल कमी भरल्याचे आढळून आले. यामुळे पट्रोलपंपचालक पेट्रोल चोरी करत असल्याचे उघड झाले.
मशिन सीलबंदची कारवाई
सगळ्यात शेवटच्या मशिनमध्ये पाच लिटरमध्ये 40 मिली कमी भरल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पथकाने लागलीच मशिनवरी सिलबंदची कारवाई केली. यानंतर युनिट मधील कंट्रोलकार्ड, पल्सर, कि-बोर्ड पथकाने ताब्यात घेवून तपासणीसाठी मुंबई किंवा कोईमतुर येथे पाठविण्यात येणार आहे. या कारवाईचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. 25-30 एमएल पेट्रोलकमी आढळल्यास कारवाईचे अधिकार हे वजनमाप विभागाला असतात. 35-40 एमएल पेट्रोल कमी आढळल्यास कारवाईचे अधिकार हे भारत पेट्रोलियमला असून यात शो-कॉज नोटीस देवून दंडाची कारवाई केली जात असते. या कारवाईचा अहवाल तयार करून पेट्रोलपंप चालकाला चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे.
मोहाडी रस्त्यावरील पंपाची देखील तपासणी
पांडे चौकातील पेट्रोल पंपावर तीन तास तपासणी करून कारवाई केल्यानंतर ठाणे क्राईम ब्रॉन्चच्या पथकाने दुपारी 1 वाजेच्या सुमारास लागलीच मोहाडी रस्त्यावरील भारत पेट्रोलियमच्या पंपाची तपासणी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर तेथील युनिटमधील मशिन तपासणून त्यातील पेट्रोल तपासले. व नमुने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, ठाणे क्राईम ब्राँन्चच्या पथकाने सोमवारी सकाळपासूनच धडक मोहिम राबविल्याने जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांचे धाबे दणाणून गेले आहे.
मोहाडी रस्त्यावरील यंत्र सुरळीत
पांडे चौकातील पेट्रोलपंपावरील मशिनांची तपासणी केल्यानंतर दुपारी 1 वाजता ठाणे क्राईम ब्रॉन्च, मोजमाप पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखा पथक मोहाडी रस्त्यावरील मुर्तुजा एम. शकील यांच्या मालकीच्या कादरी ट्रान्स्पोर्ट कंपनी या पेट्रोलपंपावर धडकली. यानंतर ठाणे क्राईम ब्रॅन्चच्या पथकाने पंपावरील युनिट तपासणी करण्यास सुरुवात केली. दरम्यान, प्रत्येक युनिटमधून पाच-पाच लिटर पेट्रोल काढल्यानंतर त्याची मोजमाप निरीक्षक पालीवाल यांच्याकडून तपासणी करण्यात आली. सगळ्या युनिटमधील यंत्रे सुरळीत चालू असून पेट्रोलमध्ये कोणतीही तफावत आढळून आली नाही. यानंतर पथकाने पेट्रोलपंपाचा तपासणीचा अहवाल तयार केला. त्यानंतर सायंकाळी दोन ते तीन तास तपासणी केल्यानंतर काही तफावत न मिळाल्याने पथक तेथून रवाना झाले. मात्र, पथकाने शहरात दोन पेट्रोल पंपावर अचानक छापा मारल्याने जिल्ह्यातील पेट्रोलपंप चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
राज्यभरात कारवाईचा धडाका
ठाणे क्राईम ब्रॅन्च पथकाकडून राज्यभरात कारवाईचा धडाका सुरु असून जळगावातही पथकाकडून कारवाई करण्यात आली. दरम्यान, राज्यभरात 72 ठिकाणी कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजू जॉन यांनी दिली. तसेच जिल्ह्यात जे पेट्रोलपंप संशयाच्या भोवर्यात सापडतील त्या पेट्रोलपंपांची तपासणी करून कारवाई करण्यात येईल, असेही जॉन यानी सांगितले.
पथकावरही वॉच..
ठाणे क्राईम ब्रॉन्चचे पथक जळगावात कारवाईसाठी येत असल्याची चर्चा रविवारपासूनच पेट्रोलपंपचालकांमध्ये सुरू असल्याने कजबुज सुरू होती. तर कोणते पथक आहे? कोण अधिकारीत आहेत? कोणत्या मार्गाने येतील? अशा गोष्टीही पेट्रोलपंपचालकांच्या व्हॉट्सअॅपवर देखील सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. तर ठाणे क्राईम ब्रॉन्चचे पथक पारोळ्या जवळ आल्यानंतर पेट्रोलपंपचालकांकडून त्यांच्यावर वॉच ठेवण्यात येत होता. तर वाहनाचा क्रमांक व्हॉट्सअॅपवर शेअर करण्यात येत होता. तर कोण अधिकारी आहेत यावरही लक्ष ठेवण्यात येत होते, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, शहरात दोन पेट्रोल पंपांची तपासणी केल्यामुळे पेट्रोलपंपचालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.