तानसा, भातसा, मोडकसागर, धामणी, बारवी धरणे भरली, मुंबईकरांची तहान भागली
मुंबई । दोेन दिवसांपासून राज्यभरात झालेल्या दमदार संततधार पावसामुळे बहुतांश धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा, भातसा, मोडकसागर धरणेदेखील पूर्णपणे भरली आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. राज्यातील अनेक धरणे काठोकाठ भरली आहेत. धरणांमधून पाणी सोडले जात असल्याने परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसाने मुंबईत येणार्या ठाणे, कल्याण, डोंबिवलीतील लाखो नागरिकांची तारांबळ उडाली होती. येथे धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने ठाणे आणि कल्याणला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण पूर्ण भरले आहे. या धरणाची क्षमता २३३.०७ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. दमदार पावसाने मुंबई लगतच्या वसई, विरार, मिरारोड आणि भाईंदरचीही चिंता मिटली आहे. येथील धामणी धरणदेखील १०० टक्के भरले आहे. या धरणाची क्षमता २७६.३५ दशलक्ष घनमीटर आहे.उजनी, राधानगरी, भंडारदरातून विसर्गसोलापुरचे उजनी धरणही पूर्ण भरले आहे. कोल्हापुरची दूधगंगा, राधानगरी, सांगलीचे वारणा ही धरणेही पूर्ण भरली आहेत. अहमदनगरच्या प्रवरा नदीपात्रातील भंडारदरा धरणातून ५,६७३ क्युसेस, निळवंडे धरणातून १८,९७५ क्युसेस तर ओझर प्रकल्पातून ८,०३५ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पालघर जिल्ह्यातील धामणी धरणाचे ५ दरवाजे उघडण्यात आले आहेत. धामणी आणि कवडास धरण मिळून एकूण १८,८०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत केला जात आहे. नालासोपारा येथे आज दिवसभरात मोठया प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत होत्या. ठिकठिकाणी तुंबलेल्या पाण्यात या ठिकाणी सकाळपासून पाच जण वाहून गेल्याचे वृत्त आहे.
पुण्यात सतर्कतेचा इशारा; खडकवासलातून २३ हजार क्युसेस पाण्याचा विसर्गपुण्याच्या खडकवासला धरणातून २३ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यांनतर ११ हजार क्युसेसचा विसर्ग सुरू करण्यात आला. यामुळे सिंहगड रस्ता परिसरातील काही इमारतींमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. महापालिकेचे कर्मचारी, पोलिस या भागात तैनात करण्यात आले आहेत. नारायण पेठ आणि डेक्कनला जोडणारा भिडे पूल पाण्याखाली गेल्याने नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे. नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणातून नदीत ११ हजार क्युसेस पाण्याच्या विसर्ग सुरू आहे. कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आली आहे.
तानसा, भातसा, मोडकसागर भरले मोडक सागर धरण पूर्णपणे भरले असून, त्यामध्ये सध्या १२८.९३ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. मोडक सागर तलाव क्षेत्रात दिवसभरात १३५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तानसा धरणदेखील जवळपास पूर्णपणे भरले आहे. सध्या तानसा धरणात १४४.५९ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. तानसा धरणाची एकूण क्षमता १४५.०८ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. भातसा धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. एकूण ९४२.१० दशलक्ष घनमीटर इतकी क्षमता असलेल्या या धरणात सध्या ९८.६९ टक्के म्हणजेच ९२९.७७ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे.
कोठून किती पाणी सोडणे सुरु झाले आहे?
धरणाचे नाव जिल्हा प्रती क्यूबिक मिटर पर सेकंद
कोकण विभाग…
सूर्या धामणी ठाणे १५८
भातसा ठाणे १३५.७५
वैतरणा नाशिक ४१.३३
नाशिक विभाग…
दारणा नाशिक १२२.२९
गंगापूर नाशिक ६२.६३
भंडारदरा अहमदनगर ९०.९५
हतनूर जळगाव २७६
पुणे विभाग…
पानशेत पुणे ४५.३१
वरसगाव पुणे ११७
खडकवासला पुणे ६८४.८१
पवना पुणे ४०.३५
चासकमान पुणे १ २८.४२
घोड पुणे ४९.८४
नीरा देवधर पुणे २०३.५४
भाटघर पुणे ६१.३६
वीर सातारा ४४२.१४
कृष्णा धोम सातारा ७.०८
कृष्णा कण्हेर सातारा १४४.६४
धोम बलकवडी सातारा ६४.००
भीमा उजनी सोलापूर ६७१.१०
वारणा सांगली ६६६.८०
दूधगंगा कोल्हापूर १७६
राधानगरी कोल्हापूर १८३.६०