पाऊस यज्ञ केल्यामुळे नव्हे तर पर्यावरणाच्या रक्षणामुळे पडतो – ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर

0

मानवत । मरावाड्यावरील दुष्काळाचे सावट हे इश्वर निर्मित किंवा निसर्ग निर्मित नाही, तर ते मानव निर्मित आहे. आपण पर्यावरणाचा ऱ्हास केला. झाडे तोडून टाकली आणि म्हणूनच आपल्या मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट आहे. दुष्काळापासून मुक्ती मिळवायची असेल तर शेतकऱ्यांनी वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात करावी, असे आवाहन ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले. यज्ञ केल्यामुळे पाऊस पडत नाही, तर पर्यावरणाचे रक्षण केल्याने पाऊस पडतो, असेही ते म्हणाले.

छत्तीस खनी हनुमान मंदिर, मानवत येथे गोकुळ अष्ठमीच्या निमित्ताने हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्याचे पहिले पुष्प वरिष्ठ प्रत्रकार, ज्येष्ठ कीर्तकार आणि प्रसिद्ध कवी शामसुंदर महाराज सोन्नर यांनी गुंफले. ते म्हणाले की, वारकरी संतांनी आपल्याला पर्यावरण रक्षणाच मंत्र दिला. ज्ञानेश्वर महाराज तर स्पष्ठ शब्दांत सांगतात की,

नगरेची रचावी । जलाशये निर्मावी॥

महा वने लावावी। नानाविध॥

इतके स्पष्ठ सांगितलेले असताना आपण मात्र त्याकडे दुर्लक्ष केले. मराठवाड्यातील जमिन सूपीक असल्याने आपण इंचइंच जमीन लागवडीखाली आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला. त्यामुळे पाऊस कमी झाला. आता पाऊस कमी झाला तर काही माणसं सांगतात की, यज्ञ करा. परंतु मी इथे सांगतो की, पाऊस यज्ञ केल्यामुळे पडत नाही, तर पाऊस न पडण्यासाठी जी अनेक कारणे आहेत, त्यात यज्ञ एक कारण आहे. कारण यज्ञासाठी वृक्ष तोड करावी लागते. आपल्याला पावसाचे प्रमाण समोल राखायचे असेल तर ३३ टक्के वनक्षेत्र असण्याची गरज आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या बांधवावर, मोकळ्या जागेवर वृक्षांची लागवड करावी, असे आवाहनही शामसुंदर महारजांनी केली.

महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सुधाणावादी चवळीत वारकरी संतांचे योगदान मोठे असून भारतीय राज्य घटनेची मूलभूत तत्त्वेसुद्धा आपल्या वारकरी संतांच्या विचारात पहायला मिळतात. भारतीय राज्य घटनेची तीन मुलभुत उद्देश सांगितले आहेत. समता, स्वातंत्र आणि बंधुत्व. हे विचार वारकरी संतांच्या साहित्यात मिळतात.

या रे या रे लहान थोर। याती भलते नारी नारी। या विचारातून आपल्या सामाजिक समता दिसते. सकळाशी येथे आहे अधिकार। यामधून आपल्याला स्वातंत्र्याचा विचार दिसतो. तर पसायदानातील भूता परस्परे पडो मैत्र जिवांचे। मधून आपल्या बंधुता दिसते. हरिनाम सप्ताहाच्या माध्यामतून संतांच्या या विचाराचा प्रचार व्हावा आणि राज्यातील सामाजिक ऐक्य भक्कम व्हावे, अशी अपेक्षाही शामसुंदर महाराजांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मृंदगार्चाय राम महाराज काजळे आणि प्रसिद्ध गायक पंढरीनाथ कदम यांनी कीर्तनाला साथ केली. कार्यक्रमास भाविक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.