पाककडून भारतीय मातेचा अपमान!

0

कुलभूषण जाधवांच्या आई, पत्नीला अपमानास्पद वागणूक

नवी दिल्ली : हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना काचेच्या पलीकडून भेटू देण्याचे नाटक पाकिस्तानने सोमवारी पार पाडले. परंतु, हे नाटकदेखील ठरल्याप्रमाणे पाकिस्तानच्या सरकारी इमारतीत न करता चक्क पार्किंग लॉटमधल्या एका शिपिंग कंटेनरमध्ये करण्यात आल्याचे उघड झाले आहे. पाकिस्तानने जाधव यांना भारतीय राजनैतिक अधिकार्‍यांना भेटू दिले नाही. त्यांच्या पत्नी व आई यांना मराठी बोलण्यावर बंदी घातली होती. सुरक्षेचे कारण पुढे करत जाधव यांच्या पत्नीचे मंगळसुत्रही पाकच्या सुरक्षा अधिकार्‍यांनी काढायला लावले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिली.

कुटुंबीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या
कुलभूषण जाधव यांची सोमवारी इस्लामाबादमध्ये त्यांची पत्नी व आई यांच्याशी काचेच्या भिंतीआडून भेट झाली. त्यांचे संभाषणही इंटरकॉमवरून झाले होते. या भेटीनंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन भारतावर आरोप केले होते. कुलभूषण जाधव हा भारतीय दहशतवादाचा चेहरा होता, असा आरोप पाकने केला होता. मंगळवारी दुपारी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन पाकला प्रत्युत्तर दिले. या भेटीदरम्यान पाकने जाधव कुटुंबीयांना चांगली वागणूक दिली नाही, असे रवीश कुमार यांनी स्पष्ट केले. सुरक्षेचे कारण पुढे करत पाकने कुटुंबीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या. पाकमधील सुरक्षा अधिकार्‍यांनी जाधव यांच्या पत्नीला मंगळसुत्र, चपल्ल, बांगड्यापासून ते अगदी टिकलीही काढायला लावली, असा दावा अधिकार्‍याने केला. तसेच भेटीपूर्वी कपडेही बदलण्यास सांगितल्याचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले.

आईला मुलाशी बोलताच आले नाही
कूलभूषण जाधव यांच्या आईने मुलाशी मराठीतून संवाद साधण्याचा प्रयत्न केला. जाधव या मुलाशी मातृभाषेतच बोलतील हे साहजिक होते, पण पाकने त्यावरही आक्षेप घेतला. त्यामुळे एका आईला तिच्या मुलाशी फार बोलताच आले नाही. त्यांची आई मराठीत बोलू लागताच आडवले जात होते, असे त्यांनी नमूद केले. उपउच्चायुक्तांना या भेटीदरम्यान उपस्थित राहता आले नाही, भारताने आक्षेप घेतल्यावर त्यांना दुसर्‍या खोलीतून ही भेट पाहता आली. भेटीदरम्यान त्यांच्यातील संभाषण किंवा कुलभूषण जाधव यांना प्रश्न विचारता आले नाही, याकडे परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी लक्ष वेधले.

सुषमा स्वराज यांची भेट घेतली
कुलभूषण जाधव यांची आई अवंतिका जाधव आणि पत्नी चेतना जाधव यांनी भारतात आल्यानंतर दिल्लीत परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांची त्यांच्या सफदरजंग लेन येथील निवासस्थानी जाऊन मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास भेट घेतली. यावेळी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर आणि परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार उपस्थित होते. स्वराज यांनी भेट घेतल्यानंतर जाधव कुटुंबातील या महिलांनी जवाहरलाल नेहरू भवनातील परराष्ट्र मंत्रालयातील अधिकार्‍यांचीही भेट घेतली. परराष्ट्र मंत्रालयाने या भेटीनंतर पत्रकार परिषद घेऊन पाकमधील भेटीची सविस्तर माहिती माध्यमांना दिली.

कुलभूषण जाधव तणावाखाली
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला मिळालेल्या माहितीनुसार, कुलभूषण जाधव हे प्रचंड तणावाखाली होते. तसेच थकलेले दिसत होते. त्यांच्या अंगावर मारहाणीच्या खुणाही दिसत होत्या. त्यांच्या बोलण्यातून दबाव दिसून येत होता. दरम्यान, वरिष्ठ अधिवक्ता अ‍ॅड. हरिष साळवे यांनी म्हटले की, असे वाटत होते की, कमांडर कुलभूषण जाधव हे पाकिस्तानी अधिकार्‍यांनी दिलेली लिखित स्क्रीप्टच वाचत होते. त्यांच्यावर नशेच्या औषधांचा प्रभावही असावा असे वाटत होते.