पाककडून मोदींना 2.86 लाखांचे बिल

0

मोदींचा विमानप्रवासातील रुट नेव्हिगेशन चार्ज

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी दौर्‍यांसाठी भारतीय हवाई दलाच्या विमानाचा वापर केला आहे. त्यावर केंद्र सरकारने एकूण दोन कोटी रुपये खर्च केले. त्यातील 2.86 लाखांचे बिल हे पाकिस्तानने पाठवलेले आहे. विदेशी दौर्‍यांदरम्यान मोदींच्या विमानाने पाकिस्तानवरून उड्डाण केले होते, त्याचा रुट नेव्हिगेशन चार्ज पाकिस्तानकडून आकारण्यात आला आहे. माहिती अधिकारातून ही बाब समोर आली आहे. पंतप्रधानांनी किती वेळा एअर इंडियाऐवजी हवाई दलाच्या विमानाचा वापर केला होता आणि किती खर्च झाला, याची माहिती आरटीआय कार्यकर्ते कमांडर (निवृत्त) लोकेश बत्रा यांनी अर्जाद्वारे मागितली होती. त्यावर जून 2016 पर्यंतची माहिती देण्यात आली आहे.

शरीफ यांच्या भेटीसाठी पाकमध्ये उतरले
या माहितीनुसार मोदींनी एकूण 11 देशांच्या दौर्‍यांसाठी हवाई दलाच्या विमानाचा वापर केला होता. त्यात नेपाळ, भूतान, बांगलादेश, अफगाणिस्तान, कतार, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, रशिया, इराण, फिजी आणि सिंगापूरच्या दौर्‍याचा समावेश आहे. 2015 मध्ये रशिया आणि अफगाणिस्तानच्या दौर्‍याहून परतताना मोदी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या भेटीसाठी काही वेळ पाकिस्तानात उतरले होते. त्याचे नेव्हिगेशन चार्ज म्हणून 1.49 लाख रुपये आकारण्यात आले. उर्वरित 77, 215 रुपये मार्च 2016 मध्ये इराण दौरा आणि 59,215 रुपये कतार दौर्‍याचे आहेत. पंतप्रधानांच्या दौर्‍याचा खर्च परराष्ट्र मंत्रालयाकडून केला जातो.