पाकच्या गोळीबारात 2 जवान शहीद

0

श्रीनगर । जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्याजवळील नियंत्रण रेषेवर पाकड्यांनी केलेल्या गोळीबारात 2 जवान शहीद झाले. यावेळी पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर मोर्टारही डागल्याचे सूत्रांनी सांगितलं. सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने सोमवारी सायंकाळी 5 वाजता स्वयंचलित मोर्टार डागले. त्यानंतर प्रचंड गोळीबार केला. विशेष म्हणजे भारताकडून कोणतीही कारवाई झालेली नसताना पाकिस्तानी सैन्याने हा हल्ला केला. त्यामुळे भारतीय लष्करानेही त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले. यावेळी रायफलमॅन विनोद सिंह आणि जाकी शर्मा गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. मात्र उपचाराला प्रतिसाद देण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

विनोद सिंह हे जम्मू-काश्मीरच्या अखनूर जिल्ह्यातील दानापूर गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या पश्‍चात वडील अजित सिंह आहेत. तर जाकी शर्मा हे जम्मूच्या हिरानगर जिल्ह्यातील सांहैल गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या पश्‍चात पत्नी रजनी देवी आहे. ’विनोद सिंह आणि जाकी शर्मा दोघेही शूर आणि प्रामाणिक सैनिक होते. राष्ट्रासाठी त्यांनी दिलेले बलिदान नेहमीच स्मरणात राहिल,’ असे संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं सांगितले.