श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील बिब्मर गली सेक्टरमध्ये पाक सैन्याकडून आज रविवारी सकाळी गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय सुरक्षा दलानेही चोख प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तानी जवानाने सकाळी 10 वाजता सांबामधील रामगडमध्ये बीएसएफच्या जवानांवर गोळीबार केला. पाकच्या गोळीबाराला भारतीय जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूने 45 मिनिटांपर्यंत गोळीबार सुरू होता. या गोळीबारात भारतीय सीमेवरील कोणतेही नुकसान झाले नाही.
पाकिस्तानकडून सीमेवर केल्या जाणार्या गोळीबाराच्या घटनेत वाढ झाली आहे. घुसखोरी करण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. गेल्या 4 दिवसांत उत्तरी नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या 14 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय सुरक्षा दलाला यश आले आहे, तर या चकमकीत एक भारतीय जवान शहीद झाला आहे. गोळीबाराच्या आडून पाकिस्तान कुपवाडा, माछिल, नौगांव सेक्टर, बांदीपुरा, बारामुल्ला आणि उरी सेक्टरमधून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती लष्कराच्या एका अधिकार्याने दिली.