पाकड्यांचा ‘हनीट्रॅप’; वायूसेनेचा अधिकारी अडकला!

0

दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेकडून अटक

नवी दिल्ली : पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या हनीट्रॅपमध्ये भारतीय वायूसेनेचे अधिकारी ग्रूप कॅप्टन अरुण मारवाह (वय 51) हे अडकले असल्याची धक्कादायक बाब शुक्रवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने उघडकीस आणली. पोलिसांनी मारवाह यांना जेरबंद केले असून, त्यांनी वायूसेनेची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविल्याचे उघडकीस आले आहे. 20 वर्षीय किरण रंधवा या आयएसआय एजंट तरुणीने मारवाह यांना आपल्या जाळ्यात ओढून अश्‍लील संभाषण केले, व आपली नग्न छायाचित्रे पाठविण्याच्या मोबदल्यात गोपनीय माहिती उकळली, अशी माहिती विशेष शाखेचे उपायुक्त प्रमोद कुशवाह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. अटकेतील अधिकार्‍याची लष्करी गुप्तचरांकडूनही कसून चौकशी सुरु करण्यात आली होती.

‘गगनशक्ती’ युद्धसरावाची माहिती लीक
दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानच्या आणखी एका हनीट्रॅपचा पर्दाफाश केला. मारवाह यांनी वायूसेनेच्या मुख्यालयातील महत्वाच्या कागदपत्रांची छायाचित्रे मोबाईलवर काढून व्हॉटसअ‍ॅपद्वारे आयएसआयची एजंट असलेल्या किरण रंधवा या तरुणीला पाठविली आहे. तसेच, तो तिच्याशी वारंवार सेक्स चॅट करत असल्याचेही तपासात उघडकीस आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मारवाहच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने 31 जानेवारीरोजी त्याला चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर अखेर त्याला अटक करण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी वरिष्ठांच्या सूचनेवरून घेतला. किरण रंधवा हिने आपण मॉडेल असल्याचे भासवून मारवाह यांना भुरळ घातली होती. आठवडाभर अश्‍लील संदेशाची देवाणघेवाण झाल्यानंतर त्याने आयएएफ युद्ध सरावाची माहितीही देण्याची तयारी किरणला दर्शविली होती. या चौकशातून गगन शक्ती या युद्धसरावाची माहिती आयएसआयला मिळाली असल्याचे उघडकीस आले आहे.

असे अडकले ग्रूप कॅप्टन मारवाह
– 20 वर्षीय किरण रंधवा या तरुणीने फेसबुकवर मारवाह यांना जाळ्यात ओढले. अश्‍लील चॅट केल्यानंतर त्यांच्याकडून सीमकार्ड व मोबाईलही उकळला.
– व्हॉटसअ‍ॅपद्वारे अश्‍लील संवाद साधून स्वतःचे नग्न व्हिडिओ व छायाचित्रे पाठविण्यासाठी गोपनीय माहिती उकळली.
– किरणही आयएसआयची एजंट असून, आपण मॉडेल असल्याचे तिने मारवाह यांना भासविले.
– मारवाह यांच्याविरुद्ध गुप्तचर कायद्याच्या कलम 3 आणि 5 अन्वये गुन्हा दाखल, फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी हस्तगत.

यापूर्वीही आयएसआयने लावले होते हनीट्रॅप!
यापूर्वी भाजपचे खासदार वरुण गांधी हेदेखील हनीट्रॅपमध्ये सापडलेले आहेत. एका विदेशी वेश्येने त्यांच्यासोबतचे खासगीक्षण सार्वजनिक करण्याची धमकी देत, देशाची गोपनीय माहिती उकळली होती. त्यामुळे शस्त्रनिर्मात्यांना सुरक्षाविषयक गोपनीय माहिती मिळाली होती. तथापि, हा प्रकार घडलाच नसल्याचा दावा वरुण गांधी यांनी केला होता. दुसरा, प्रकार आयएसआयनेच मीणा रैना नावाच्या महिलेकडून करवून घेतला होता. पठाणकोट एअरफोर्स स्टेशनवर तैनात सुनील कुमार या एअरमॅनला नादी लावून त्याच्याकडून गोपनीय माहिती या महिलेने मिळविली होती. ती आयएसआयला पुरविली होती. सिकंदराबाद येथे तैनात लष्करी जवान पाटनकुमार पोद्दार हादेखील एका महिला गुप्तचराच्या जाळ्यात अडकला होता. त्याने तर लष्कराची अनेक गोपनीय माहिती आयएसआयला पुरविली होती. ही महिला या माहितीच्या मोबदल्यात आपली नग्न छायाचित्रे या जवानाला पाठवित होती.