आमच्या ताकदीची परीक्षा घेऊन बघा : भारताला धमकावले
इस्लामाबाद : दहशतवाद्यांना पोसणार्या पाकिस्तानच्या कुरापती अजूनही थांबलेल्या नाहीत. पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. पाकिस्तान केवळ अण्वस्त्र हल्ल्याची कोल्हेकुई करत असल्याचे भारताला वाटत असेल तर त्यांनी त्याचा अनुभव घ्यावा, अशा शब्दात पाकचे परराष्ट्र व्यवहारमंत्री असिफ ख्वाजा यांनी भारताला धमकावले. ट्विटरवरून त्यांनी ही धमकी दिली. भारताच्या लष्करप्रमुखांचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे आहे. त्यांचे वक्तव्य अण्वस्त्र हल्ल्याला आमंत्रण देणारे आहे. रावत यांची इच्छा असेल तर आमच्या अण्वस्त्र हल्ल्याचा अनुभव ते घेऊ शकतात. त्यामुळे त्यांचा संशय दूर होईल, इन्शाल्लाह, अशी धमकी असिफ यांनी दिली. लष्करप्रमुख रावत यांनी 12 जानेवारीरोजी असे म्हटले होते, की भारतीय सेना पाकिस्तानच्या अणुहल्ल्याला, दिखावेगिरीला प्रत्युत्तर देण्यास संपूर्णपणे सज्ज आहे. सरकारची परवानगी मिळली तर आमचे जवान सीमेपार जाऊन कोणतीही मोहीम फत्ते करू शकतात. दोन्ही देश परस्परसंबंध सुधारण्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्नशील आहेत. पण, जम्मू-कश्मीरमध्ये सतत होणार्या दहशतवाद्यांच्या घुसखोरीमुळे वातावरण बिघडत आहे, अशी टीका लष्करप्रमुख रावत यांनी केली होती.
लष्करप्रमुख रावतांच्या इशार्याला दिले प्रत्युत्तर
पाकिस्तानच्या अण्वस्त्र हल्ल्याची धमकी पोकळ आहे, त्याला काही अर्थ नाही. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले तर त्यांना जशास तसे उत्तर मिळेल, असे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी म्हटले होते. त्यानंतर या वक्तव्याचा निषेध नोंदवताना पाकिस्तानने भारताला थेट अण्वस्त्र हल्ल्याचीच धमकी दिली आहे. यापूर्वी सप्टेंबर 2016 मध्ये ख्वाजा आसिफ यांनी भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली होती. आता पुन्हा एकदा त्यांनीच भारताविरोधात गरळ ओकत अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. ख्वाजा मोहम्मद असिफ यांनी, भारतीय लष्करप्रमुखांचे वक्तव्य अतिशय बेजबाबदारपणाचे असून, त्यांच्या पदाला शोभणारे नाही. हे अणुयुद्धाला आमंत्रण देण्यासारखे आहे. जर त्यांना असे वाटते की ते आमच्या (पाकिस्तान) क्षमतांची परीक्षा करू शकतात तर त्यांचा हा गैरसमज लवकरच दूर होईल. हे प्रकरण एवढे सहज घेतले जाणार नाही. पाकिस्तानबाबत गैरसमज करून घेऊ नका. स्वत:च संरक्षण करण्यास पाक सक्षम आहे, असा गर्भीत इशाराही दिला होता. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे संबंध तणावाचे आहेत. पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबताना दिसत नाहीत. दहशतवाद्यांची घुसखोरी आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन वारंवार होताना दिसते आहे. अशात आता पाकिस्तानने पुन्हा एकदा अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिल्याने या धमकीला भारताकडून कसे उत्तर दिले जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.