पाकड्यांचे 7 जवान टिपले!

0

भारतीय लष्कराची कारवाई : पाक म्हणते चार जवान शहीद

श्रीनगर/रावळपिंडी : जम्मू-कश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करणार्‍या कुरापती पाकड्यांना भारतीय लष्कराने दणका दिला आहे. सोमवारी सैन्यदिनाच्या दिवशीही पाकड्यांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय चौक्यांना लक्ष्य करत गोळीबार केला होता. या गोळीबाराला भारतीय लष्कराने सडेतोड प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानमधील कोटली सेक्टर येथील पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर जवानांनी तुफान गोळीबार केला. यात पाकिस्तानच्या सात जवानांचा खात्मा करण्यात यश आले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत ट्वीट केले आहे. तर पाकिस्तानी वृत्तवाहिनी जिओ टीव्हीने भारताच्या हल्ल्यात चार जवान ठार झाल्याचे नमूद केले आहे. पाकिस्तानी लष्करानेही प्रत्युत्तर देत केलेल्या हल्ल्यात तीन भारतीय जवान शहीद झाल्याचे वृत्तही या वृत्तवाहिनीने पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विभागाच्यावतीने दिले आहे.

सहा दहशतवाद्यांनाही टिपले!
सोमवारी सकाळी जम्मू-कश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणार्‍या ‘जैश- ए- मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या सहा दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. भारतीय लष्कर आणि जम्मू-कश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. ठार केलेल्या 6 पैकी 5 दहशतवाद्यांचा मृतदेह लष्कराच्या हाती लागले असून, अन्य एका मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे. याआधी सैन्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला केला होता. पाकिस्तानने आपल्या कुरापती थांबवल्या नाहीत आणि दहशतवाद्यांना मदत करण्याचे सुरूच ठेवले तर नाईलाजाने भारतीय लष्कर त्यांच्याविरोधात सगळ्यात मोठी कारवाई करेल, असा खणखणीत इशारा रावत यांनी दिला होता. भारतीय लष्कराने 2017 मध्ये कुरापती पाकिस्तानच्या 138 जवानांना ठार केल्याची माहितीही त्यांनी दिली होती. दुसरीकडे, जिओ टीव्हीच्या वृत्तानुसार, जनड्रोट आणि कोटली सेक्टरमध्ये कार्यरत असलेल्या पाकिस्तानी सैन्यावर भारतीय लष्कराने मोर्टारद्वारे जोरदार हल्ला केला. त्यात चार पाक सैनिक ठार झाले आहेत. पाकिस्तानी सैन्यानेदेखील भारताला प्रत्युत्तर दिले, त्यात भारताचे तीन जवान शहीद झाल्याची माहितीही त्यांनी आयएसपीआर या पाक लष्कराच्या मीडिया विभागाच्या हवाल्याने दिली आहे. तसेच, काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने सहा काश्मिरी नागरिकांची हत्या केल्याचा आरोपही पाकिस्तानने केला आहे.

पाकड्यांच्या उलट्या बोंबा सुरुच!
पाकिस्तानी लष्कर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असताना, पाकड्यांनी उलट्या बोंबा ठोकत भारतच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार करत असल्याचा आरोप केला आहे. भारताच्या या हल्ल्यात पाकिस्तानी जवानांसह नागरिकांचे बळी जात असल्याची ओरडही त्यांनी केली आहे. 25 डिसेंबरला भारताच्या हल्ल्यात तीन पाक जवान ठार झाले होते. पाकिस्तानी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारताने नवीन वर्षाच्या पहिल्या 14 दिवसांतच 70 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून, 2017 या वर्षात 1900 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोपही पाकिस्तानने केला आहे.