पाकड्यांच्या गोळीबारात तीन जवान शहीद

0

शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच; भारताचेही चोख प्रत्युत्तर

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील केरी सेक्टरजवळ पाकिस्तानने भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्यामध्ये तीन भारतीय जवान शहीद झाले आहेत. तसेच या हल्ल्यात एक जवान गंभीररीत्या जखमी झाला असून त्याला उपचारासाठी तातडीने सैनिकी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शस्त्रसंधी नियमाचे भंग करून पाकड्यांनी हे हल्ले केले आहेत. त्यांना भारतीय सैन्यानेदेखील जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली होती.

जम्मूमधील अखनूरजवळ असलेल्या केरी सेक्टरवर भारतीय जवान गस्त घालत असताना अचानकपणे पाकिस्तानचे जवानांनी भारतीय जवानांना लक्ष्य करत, जोरदार गोळीबार केला. या गोळीबारामध्ये गस्त घालत असलेल्या तुकडीचे अधिकारी आणि दोन जवान जागीच ठार झाले. तर एक जवान गंभीर जखमी झाला. केरी सेक्टरवरील हा या आठवड्यातील दुसरा हल्ला आहे. या अगोदर गेल्या रविवारी पाकिस्तानच्या जवानांनी याठिकाणी भारतीय चौक्यांना लक्ष्य करत गोळीबार केला होता. परंतु, यावेळी भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हल्ल्याला चोख प्रतिउत्तर देत त्यांचा हल्ला परतवून लावला होता. तसेच या हल्ल्यात भारताची कसल्याही प्रकराची हानी झाली नव्हती. परंतु, आजच्या हल्ल्यामध्ये तीन भारतीय जवान ठार झाल्यामुळे भारताचे मोठे नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत भारतीय सैन्य बदला घेण्याचा प्रयत्न करत होते.