संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे ; प्रत्येकाच्या मनात रक्षाताई
भुसावळ- जम्मू कश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात झालेल्या प्रत्येक शहिदाच्या बलिदानाचा देश नक्कीच बदला घेईल, दहशतवाद्यांना पोसणार्या पाकिस्तानच्या घरात घुसून बदला घेतला जाईल, अशी ग्वाही संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी येथे दिली. आरपीडी रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान (डी.एस.ग्राऊंड) वर गुरुवारी झालेल्या खासदार रक्षा खडसे यांच्या ‘समर्पण’ या कार्यवृत्तांताच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. डॉ.भामरे म्हणाले की, देशात सक्षम नेतृत्व असेल तर सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून बदला घेता येतो, आमच्या आर्म फोर्सचा आम्हाला अभिमान असून सर्वात बलाढ्य सैन्य आपले आहे. खासदार रक्षा खडसे यांचे गृहिणी ते सामाजिक कार्य हे उत्तम उदाहरण असून खासदार म्हणून त्या करीत असलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगत प्रत्येकाच्या मनात रक्षाताई असून काम करणार्यांना जनता नक्कीच डोक्यावर घेते, असेही ते म्हणाले.