पाकड्यांसोबत क्रिकेट नाही!

0

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या दरम्यान कोणतेही क्रिकेट सामने होणार नाहीत. पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देत असून, दहशतवाद आणि खेळ एकत्र येऊ शकत नाही, असे केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी सोमवारी पाकिस्तानला ठणकावले. पाकिस्तानने दहशतवादाला प्रोत्साहन देणे थांबवावे, त्यानंतरच त्यांच्यासोबत क्रिकेट असो की अन्य खेळ भारत खेळू शकेल, असेही गोयल म्हणाले. भारतीय क्रिकेट नियमन बोर्ड (बीसीसीआय) व पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी)च्या वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक दुबईत आयोजित करण्यात आली होती. तत्पूर्वीच केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केल्याने या बैठकीची औपचारिकता संपली आहे. तसेच, इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी 2017चे आयोजन करण्यात आले असून, त्यात 4 जूनरोजी भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानी संघासोबत होणार आहे. त्यामुळे या सामन्यावरदेखील आता प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.

सरकारशी चर्चा न करता बीसीसीआयने प्रस्ताव देऊ नये!
पत्रकारांशी बोलताना क्रीडामंत्री गोयल यांनी सांगितले, की पाकिस्तानकडून दहशतवादाला प्रोत्साहन दिले जात आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत राहील, तोपर्यंत त्यांच्याशी आम्ही कोणताही खेळ खेळू शकत नाही. दोन्ही देशांदरम्यान कोणताही क्रिकेट सामना होऊ शकणार नाही, असेही त्यांनी नीक्षून सांगितले. खेळ आणि दहशतवाद एकसाथ चालू शकत नाही. पाकिस्तानसोबत सामना खेळण्याबाबत बीसीसीआय नियोजन करत असेल तर त्यांनी सरकारची परवानगी घ्यावी, असेही गोयल यांनी बीसीसीआयला बजावले. सरकारशी चर्चा न करता बीसीसीआय प्रस्ताव देतेच कसा? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आंतरराष्ट्रीयस्तरावर एखादा सामना पूर्वनिर्धारित असेल तर तो होऊ शकतो, असेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात स्पष्ट केले. बार्मिंघम येथे चार जूनपासून चॅम्पियन्स टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची सुरुवात भारत-पाकिस्तान सामन्याने होणार आहे. या सामन्याबाबत अद्याप निर्णय झाला नसला तरी, त्यासाठी केंद्र सरकारने होकार दिला आहे.

पाकसोबत सामन्यांसाठी यापूर्वीच करार!
2015 ते 2023 वर्षाच्या काळात भारत-पाकिस्तानदरम्यान एकूण सहा सामने खेळण्याबाबत चर्चा करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) पदाधिकारी व पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अधिकारी दुबई येथे सोमवारी भेटले. या बैठकीचा तपशील उशिरापर्यंत हाती आला नसला तरी, दोन्ही देशांदरम्यान समंजस्य करार 2014 मध्ये झाला होता. या करारानुसार, 2023 पर्यंत सहा सामने खेळण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. तथापि, केंद्र सरकारने या कराराला मंजुरी न दिल्यामुळे 2015 मध्ये दोन्ही देशांदरम्यान सामने झाले नव्हते. दरम्यान, दोन्ही संघ येत्या रविवारी एजबस्टन येथे आमने-सामने येणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांना ब गटात ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकाही याच गटात आहेत. चारही संघ मजबूत असल्यामुळे हा गट कठीण असल्याचे बोलले जात आहे. अ गटात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि बांगलादेश यांचा समावेश आहे.