पाकड्यांसोबत क्रिकेट नाही!

0

सुषमा स्वराजांनी ठणकावले

नवी दिल्ली : पाकिस्तानकडून दहशतवादाला प्रोत्साहन देणे जोपर्यंत थांबत नाही, तोपर्यंत त्यांच्यासोबत भारतीय क्रिकेट संघ कोणतीही क्रिकेट मालिका खेळणार नाही, असे परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला ठणकावून सांगितले. संसदेच्या एका समितीला त्यांनी ही माहिती दिली. यावेळी परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर आणि परराष्ट्र सचिव एस. जयशंकरही उपस्थित होते. या समितीपुढे बोलताना स्वराज म्हणाल्यात, त्यांनी पाकिस्तानच्या भारतातील राजदूतांची भेट घेऊन 70 वर्षांवरील कैदी किंवा मानसिक रुग्ण असलेले कैदी, महिला यांचा मानवतेच्या दृष्टीकोणातून विचार करत, दोन्ही देशांनी त्यांची सुटका करावी, असा प्रस्ताव मांडला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही दिली माहिती
पाकिस्तानकडून वारंवार होणारे शस्त्रसंधी कायद्याचे उल्लंघन आणि त्यात भारतीय जवानांना आपले प्राण गमवावे लागणे हे भारत-पाक सामन्यांसाठी योग्य वातावरण नसल्याचे सांगून, स्वराज यांनी दहशतवादी हल्ले करुनही पाकिस्तान क्रिकेट सामने खेळण्याची अपेक्षा कशी करु शकते, असा सवाल केला. परराष्ट्र सचिव एस. जयशंकर आणि सुषमा स्वराज यांनी भारताच्या शेजारील राष्ट्रांशी संबधांवर नुकतीच पंतप्रधान मोदी यांना माहिती दिली. यावेळी पत्रकारांनी गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भारत-पाक क्रिकेट मालिकेबद्दल सुषमा स्वराज यांना विचारले असता, मानवतेच्या दृष्टीकोनातून मध्यंतरी दोन्ही सरकारने आपल्या कैदेत असलेल्या इतर देशांतील कैद्यांना सोडण्यावर एकमत निर्माणे झाले होते. यावेळी भारताने काही पाकिस्तानी नागरिकांना भारतात उपचार घेण्यासाठी तात्काळ वैद्यकीय व्हिजाही उपलब्ध करुन दिला होता. मात्र त्यानंतरही पाकिस्तान सीमेपलिकडून कुरापती करतच आहे. त्यांचे हे वागण क्रिकेट मालिका खेळण्यासाठी निश्चितच योग्य नसल्याचे स्पष्टीकरण स्वराज यांनी दिले.

पाककडून भारतासोबत कुरापती सुरुच!
हिजबुल मुजाहिद्दीनचा तरुण कमांडर बुरहान वाणी याला गेल्या वर्षात भारतीय फौजांनी काश्मीरमध्ये यमसदनास धाडले. या घटनेनंतर पाकिस्तानकडून अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. सीमेपलीकडून होणार्‍या दहशतवादी कारवायांमध्ये अनेक भारतीय नागरिक आणि सुरक्षारक्षकांना आपले प्राण गमवावे लागले. यातच हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी कैदेत असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या परिवाराला पाकिस्तानमध्ये अधिकार्‍यांकडून चांगलाच त्रास देण्यात आला. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामने होणे अशक्य असल्याचे संकेत सुषमा स्वराज यांनी दिले.

ट्रम्प यांनीही ठणकावले, पाकिस्तानला मदत नाही!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला चांगलेच खडसावले आहे. अमेरिका येथून पुढे पाकिस्तानला कोणतीही आर्थिक मदत आता करणार नाही असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. अमेरिकेच्या मदतीच्या बदल्यात पाकिस्तान कायमच अमेरिकी नेतृत्वाशी खोटेच बोलत आल्याची टीका ट्रम्प यांनी केली. अमेरिकेने आजपर्यंत गेल्या 15 वर्षांत मूर्खासारखे सुमारे 33 अब्ज डॉलर पाकिस्तानला मदत म्हणून दिले. मात्र पाकिस्तानने त्या बदल्यात अमेरिकी नेतृत्त्वाला मूर्ख समजून थापा आणि फसवणूक यांनीच परतफेड केली, असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.