इस्लामाबाद: मुंबईवर 2008 मध्ये झालेला दहशतवादी हल्ला पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांनीच घडवून आणल्याची कबुली पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार महमुद अली दुराणी यांनी दिली. मात्र, या हल्ल्यात पाकिस्तानी सरकारचा कोणताही सहभाग नव्हता, असा दावाही दुराणी यांनी केला.
दिल्लीतल एका संस्थेने आयोजिलेल्या आशियाई सुरक्षा परिषदेत दुराणी बोलत होते. ”26/11 चा दहशतवादी हल्ला हे सीमेपलीकडील दहशतवादाचेच उदाहरण आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांनीच हा हल्ला घडविला. परंतु, पाकिस्तानमधील सरकार वा इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) या गुप्तचर संस्थेचा यामध्ये कसलाही सहभाग नव्हता, याची मला पूर्ण खात्री आहे,” असे दुराणी म्हणाले.
पाकिस्तानातील जमात-उद-दवा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हफीझ सईद याच्याविषयीही दुराणी यांना यावेळी विचारणा करण्यात आली. यावर, सईदचा पाकिस्तानला काहीही उपयोग नसून, त्याला शिक्षा व्हावलाच हवी, असे दुराणी म्हणाले.