पाकमध्ये भारतीय मालिका

0

नवी दिल्ली । भारतीय टीव्ही मालिकांवर लावण्यात आलेली बंदी पाकिस्तानमधील न्यायालयाने उठवली आहे. ’तंत्रज्ञानामुळे देशांमधील अंतर कमी होत चाललं असून सर्वजण जवळ आले आहेत, अशावेळी तुम्ही विनाकारण कोणतीही बंधने घालू शकत नाही’, असे न्यायालयाने खडसावले आहे. लाहोर उच्च न्यायालयात भारतीय टीव्ही मालिकांवर लावण्यात आलेल्या बंदीविरोधात याचिका करण्यात आली होती. याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने आपले मत मांडले, तसेच बंदी उठवली आहे.

पाकमध्ये होती बंदी
त्यामुळे पाकिस्तानी चाहत्यांना पुन्हा एकदा भारतीय मालिका पाहता येणार आहेत. लाहोर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मन्सूर अली शाह यांनी स्पष्ट केले की, ’एखाद्या मालिकेतील मजकूर आक्षेपार्ह किंवा पाकिस्तानविरोधी असेल तर तुम्ही तो सेन्सर करु शकता. मात्र पुर्ण बंदी आणण्याची काही गरज नाही’. पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अ‍ॅथोरिटीने बंदी मागे घेतली असून मालिकांचे प्रसारण करण्यास सुरुवात केली आहे.