नवी दिल्ली । पाकिस्तानप्रणित दहशतवादाने भारताला नेहमीच लक्ष्य केले असून सीमेवरील जवानांपासून ते कुठल्याही शहरात राहणार्या सामान्य नागरीकांनाही जीवे मारण्यापर्यंतचे कुकृत्य केली आहेत. तथापी भारतीय सैन्यही पाकच्या सर्वच कारवायांना चोख प्रत्युत्तर देत असे. मात्र पाकच्या एकूणच कुरापती वाढल्यानंतर सैन्य दलास काही विशेष अधिकार तथा मोकळीक देण्यात आली. याचा सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येत असून यावर्षी 2 जुलै पर्यंत तब्बल 92 अतिरेक्यांना भारतीय सैन्यांनी यमसदनी धाडले.
2016 मध्ये जुलैपर्यंत ही संख्या 79 होती. 2012 व 2013 मध्ये ठार करण्यात आलेल्या अतिरेक्यांपेक्षा यावर्षी अधिक अतिरेक्यांना कंठस्नान घातल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 2012 मध्ये 72 तर 2013 मध्ये 67 दहशतवादी मारले गेले. पण विद्यमान सरकारच्या काळात 2014 मध्ये हा आकडा उसळून 110 वर पोहोचला. 2015 मध्ये 108 तर 2016 मध्ये 150 अतिरेक्यांना ठार केले आहे.
अतिरेक्यांचा माग काढून खात्मा
यावर्षी जुलैपर्यंत मारले गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये अतिरेक्यांचे मोठे मोहरे टिपण्यातही सरकारला यश आलंय. गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, संरक्षण दलाला खोर्यात लपलेल्या अतिरेक्यांचा माग काढून त्यांचा खात्मा करण्यासाठी त्यांना मोकळीक दिली असून दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू करण्यापूर्वी त्या मोहिमेची संपूर्ण आखणी केली जाते. कमीत कमी नुकसान करत अतिरेक्यांचा खात्मा कसा होईल, यादृष्टीने कारवाईला अंतिम स्वरुप देण्यात येते.
यावर्षी जुलैपर्यंत जितके अतिरेकी ठार झाले असून ही संख्या 2014 -2015 मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपेक्षा थोडीशीच कमी आहे. तथापी या कामगिरीचे श्रेय लष्कर, निमलष्करी दल आणि इंटेलिजन्स एजन्सींना आहे.
-एक वरिष्ठ अधिकारी, भारतीय सैन्य दल