वॉशिंग्टन : पाकिस्तानला दहशदवादाचे प्रायोजक राष्ट्र घोषित करा, अशी मागणी असणारे विधेयक अमेरिकन काँग्रेसचे एक सदस्य आणि सभागृहाच्या दहशतवादसंबंधी उपसमितीचे अध्यक्ष टेड पो यांनी कनिष्ठ सभागृहात मांडले. अमेरिकेचे पाकिस्तानसोबतचे संबंध नेमके कशा प्रकारचे आहेत याची निश्चिती करावी, अशीही मागणी या विधेयकातून करण्यात आली आहे.
पाकिस्तान हा बेभरोशी देश आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या शत्रूंना देखील या देशाने सहकार्य केले आहे, असे पो यांनी हे विधेयक मांडताना म्हटले आहे. पाकिस्तान स्टेट स्पॉन्सर ऑफ टेररिझम अॅक्ट असे या विधेयकाचे नाव आहे. पाकच्या कारवायांचा पाढा वाचताना पो यांनी पाकने ओसामा बिन लादेन याला सहकार्य केल्याचा उल्लेख केला. त्याचबरोबर हक्कानी नेटवर्कशी जवळचे संबंध प्रस्थापित करण्यापर्यंतही पाकची मजल गेली असून, पाक दहशतवादविरोधी लढाईत नेमका कोणाबरोबर आहे, याचा यातून अंदाज येतो, असेही पो यांनी म्हटले आहे.
पाकची ओळख दहशतवादाचे समर्पक राष्ट्र अशीच करून देणे योग्य ठरेल, असे स्पष्ट करतानाच या देशाला दिली जाणारी मदत बंद करावी, अशी मागणीही पो यांनी केली आहे. दहशतवाद मोडून काढण्यात पाकिस्तानने सहकार्याची भूमिका घेतली का याचे उत्तर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन महिन्यात देण्याची मागणी त्यांनी केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला दहशतवाद प्रायोजक राष्ट्र घोषित करणारा अहवाल सादर करण्याची मागणीही त्यांच्याकडून करण्यात आली आहे.