ख्राइस्टचर्च । आयसीसी 19 वर्षाखालील विश्वचषक क्रिकेटस्पर्धेच्या दुसर्या उपांत्य फेरीच्या साामन्यात भारताने पारंपारीक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 203 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह भारताने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता 3 फेब्रुवारीला भारतविरूद्ध ऑस्ट्रेलिया असा अंतिम सामना रंगणार आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना शुभम गिलच्या नाबाद शतकाच्या जोरावर पाकसमोर 273 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या संघावर भारतीय गोलंदाजांनी जोरदार हल्ला करत 69 धावांवरच रोखले आणि विजय मिळवला. भारताच्या 273 धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. पाकच्या एकाही फलंदाजाला 20 च्यावर धावा करता आल्या नाही. भारताकडून इशान पोरलने 6 षटकांमध्ये 17 धावा देत 4 गडी बाद केले. त्याने दोन निर्धारीत षटकेही टाकली. तर शिवा सिंग व रायन परागने प्रत्येकी दोन, अभिषेक शर्मा व अनुकूल रॉयने प्रत्येकी एक गडी बाद केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारीत 50 षटकांत 9 बाद 272 धावा ठोकल्या. शुभम गिलचे नाबाद शतक आणि कर्णधार पृथ्वी शॉ आणि मनज्योत कालरा यांनी सलामीला रचलेली उत्तम भागीदारी याच्या जोरावर भारताने पाक समोर मोठे आव्हान ठेवले. पाकिस्तानच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे मिळालेल्या जिवदानाचा फायदा उठवत पृथ्वी, मनज्योतने 89 धावांची भागिदारी रचली. हे दोघे बाद झाल्यावर फलंदाजीची मदार संभाळत शुभम गिलने शतक झळकावले. गिलने 94 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 102 धावा फटकावल्या. कर्णधार पृथ्वी शॉने 41 तर मनज्योत कालराने 47 धावा केल्या.
मी पित्याचे कर्तव्य केले
पृथ्वीच्या नेतृत्वाखाली भारताने ही किमया साधली. यावेळी या विजयाबद्दल पृथ्वी शॉचे वडिल पंकज यांना विचारले असता ते म्हणाले, मी केवळ एका बापाचे जे कर्तव्य असते ते केले मात्र खरी मेहनत ही त्याचीच आहे. प्रत्येक क्रिकेटरचे स्वप्न असते भारताला विश्वचषक जिंकून द्यावा. त्यामुळे निर्णायक लढतीमध्येही भारतीय संघ चांगली कामगिरी करेल. राहुल द्रविड यांचे मार्गदर्शन पृथ्वीला अतिशय मोलाचे ठरले. त्यांच्याकडून तो नेतृत्वगुण शिकतोय.
पाकिस्तानवर मिळालेल्या या विजयात भारतीय गोलंदाज विजयाचे शिल्पकार ठरले. त्याचप्रमाणे मोठी धावसंख्या उभारण्यात मदत करणारा शुभम गिलही या विजयाचा हिरो ठरला. त्याने 94 चेंडूत नाबाद 102 धावा केल्या. या शतकासोबतच त्याने अनेक विक्रमही नावावर केले. 19 वर्षाखालील विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्यातील आतापर्यंतचे हे पहिले शतक आहे. शुभम गिलने शतक ठोकत पाकिस्तानच्या सलमान बट्टला मागे टाकले. सलमान बट्टने 2002 साली भारताविरुद्ध 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत नाबाद 85 धावांची खेळी केली होती.19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत सर्वात वेगवान शतक ठोकणार्या भारतीय फलंदाजांच्या यादीतही त्याचा समावेश झाला आहे. सर्वात वेगवान शतक ठोकणारा तो तिसरा खेळाडू ठरला.
विराट कोहलीने 2008 साली वेस्ट इंडिजविरुद्ध 73 चेंडूत, ऋषभ पंतने निमिबियाविरुद्ध 82 चेंडूत शतक पूर्ण केले होते. शुभम मूळचा पंजाबचा आहे. युथ वन डेत त्याच्या नावावर (2016-18) आतापर्यंत 14 सामन्यांमध्ये 1118 धावा आहेत. ज्यामध्ये चार शतके आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. 103.23 च्या सरासरीने त्याने धावा काढल्या आहेत. या विश्वचषक स्पर्धेत शुभमने पाच सामन्यातील चार डावांमध्ये 170.50 च्या सरासरीने 341 धावा केल्या आहेत. आतापर्यंत त्याने एका शतकासह तीन अर्धशतके केली आहेत. शुभमने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात 63, पीएनजीविरुद्ध फलंदाजीची संधी मिळाली नाही, झिम्बाम्ब्वेविरुद्ध नाबाद 90 धावा, बांगलादेशविरुद्ध 86 आणि उपांत्य फेरीमध्ये पाकिस्तानविरुद्ध नाबाद 102 धावा केल्या. मेहदी हसन मिराजनंतर सलग चार वेळा 50 पेक्षा जास्त धावा करणारा शुभम दुसरा खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत कुणीही सलग चार वेळा 50 पेक्षा जास्त धावा केलेल्या नाहीत.
मोठ्या खेळीचा विश्वास होता
शुभम गिलच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने अंतिम सामन्यामध्ये धडक मारली. शुभमच्या या खेळीने त्याचे संपूर्ण कुटुंब सध्या प्रचंड आनंदात आहे. प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना शुभमच्या वडिलांनी आपला आनंद व्यक्त केला. शुभम आम्हाला आधीच म्हणाला होता की, मी शतक झळकावून येणारच. तसेच पाकिस्तान विरुद्ध मोठी खेळी करणार याचाही त्याला विश्वास होता. मुलाने देशाची मान अभिमानाने उंचावली आहे, अशी प्रतिक्रिया शुभमचे वडील लखविंदर गिल यांनी दिली. उपांत्य फेरीत नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी पृथ्वी शॉ आणि मनज्योत कालराने सुरुवातही चांगली केली. पण 89 धावांवर भारताची पहिली विकेट गेली. त्यानंतर शुभमने शेवटच्या चेंडूपर्यंत धडाकेबाज फलंदाजी करत भारताला 272 धावांचा टप्पा गाठून दिला. एका बाजूने विकेट जात असतानाही शुभमने दुसरी बाजू भक्कमपणे लावून धरली होती. त्याने भारतीय डावाच्या शेवटच्या चेंडूवर आपले शतक पूर्ण केले. या विश्वचषकात तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.