हंसराज अहिरांनी फारुख अब्दुल्लांना सुनावले
नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीर हा कोणाच्या बापाच्या मालकीचा नाही, असे विधान करणार्या नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पाकव्याप्त काश्मीर (पीओके) हा भारताचाच हिस्सा असून, त्याच्यावर भारताचाच हक्क आहे, अशा शब्दांत अहिर यांनी अब्दुल्लांना सुनावले.
गेल्या काही दिवसांपासून नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी पाकव्याप्त काश्मीरविषयी बेताल विधान करुन वादाला तोंड फोडले होते. फारुख अब्दुल्ला यांच्या या विधानांवर हंसराज अहिर यांनी गुरुवारी प्रत्युत्तर दिले. फारुख अब्दुल्ला यांचे विधान निषेधार्हच आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच हिस्सा आहे. मात्र, मागील सरकारमुळे तो भाग पाकिस्तानकडे गेला. आता आम्ही पीओके पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला तरी आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. पीओकेवर भारताचाच हक्क आहे आणि तो परत मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.