पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग

0

फारुख अब्दुल्ला यांचे वादग्रस्त वक्तव्य

श्रीनगर : पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग आहे आणि तो पाकिस्तानकडून कोणी हिसकावून घेऊ शकत नाही, काश्मीरचा जो भाग भारताकडे आहे, तो भारताचा हिस्सा आहे. कितीही युद्ध झाले तरी हे बदलणार नाही, असे वादग्रस्त विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे जेष्ठ नेते फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे.

काश्मीरचा एक भाग त्यांच्याकडेही
दोन्ही देशांमध्ये काश्मीरी जनतेला स्वायत्तता द्यायला हवी. काश्मीर चारही बाजुंनी अण्वस्त्रसंपन्न राष्ट्रांनी घेरलेले आहे, त्यामुळे काश्मीरची स्वातंत्र्याची मागणी योग्य नाही, असे अब्दुल्ला म्हणाले. केंद्र सरकारने काश्मीर शांततेसाठी नेमलेले संवादक दिनेश्‍वर शर्मा यांच्या चर्चेविषयी अब्दुल्ला म्हणाले, मी यावर अधिक टिप्पणी करणार नाही. त्यांनी केवळ चर्चा केली आहे. केवळ चर्चेने प्रश्‍न सुटणार नाही. हा प्रश्‍न भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा आहे. भारत सरकारला पाकिस्तानच्या सरकारसोबत चर्चा करायला हवी, कारण काश्मीरचा एक भाग त्यांच्याकडेही आहे.

पाकिस्तानसोबतही चर्चा करा
अब्दुल्ला म्हणाले, भारत सरकारला काश्मीरमध्ये शांतता हवी असेल तर सरकारने पाकिस्तानसोबतही चर्चा करायला हवी. यात काश्मीरच्या दोन्ही भागांना स्वायत्तता द्यायला हवी. पाकव्याप्त काश्मीर भारताचे अभिन्न अंग आहे, अशी भारत सरकारची भूमिका आहे.