पाकसीमेत घुसून तीन जवान मारले

0

श्रीनगर : भारतीय सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार करणार्‍या पाकिस्तानी सैन्याला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. पाकिस्तानी जवानांनी गस्तीवर असलेल्या भारतीय जवानांवर गोळीबार करून चौघांना ठार मारले होते. या घटनेचा सोमवारी लष्करी कमांडोंनी बदला घेतला. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्याआत घुसून या कमांडोंनी तीन पाकिस्तानी सैन्याला कंठस्नान घातले. या हल्ल्यात आणखी काही पाकसैनिक गंभीर जखमी झाले आहेत. ही कारवाई करून भारतीय लष्करी कमांडो आपल्या सीमारेषेत सुखरुप परतही आले होते. भारताच्या या कारवाईने भारत व पाकिस्तानदरम्यानचा तणाव चांगलाच वाढला होता. काश्मीरमधील केरी-राजौरी सेक्टरमध्ये पाकड्यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या हल्ल्यात एका मेजरसह चौघांचा बळी गेला होता, या घटनेचा असा बदला भारतीय लष्कराने घेतला आहे. दुसरीकडे, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा बुटका कमांडर नूर मोहम्मद तंत्री यालाही कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. पॅरोलवर सुटलेला तंत्री फरार झाला होता. तो दहशतवाद्यांच्या गर्दीत उभा असताना लष्करी जवानांनी त्याला बरोबर टिपले व त्याची यमसदनी रवानगी केली.

भारत-पाक सीमेवर तणाव वाढला
लष्करी सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, या कमांडो कारवाईला सर्जिकल स्ट्राईक म्हणता येणार नाही, परंतु भारतीय जवानांवर गोळीबार करणार्‍या पाकिस्तानी सैन्याला या कारवाईतून सूचक इशारा देण्यात आलेला आहे. रावळकोट भागातील रुखचक्री सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईत आपले तीन जवान ठार झाल्याची माहिती पाकिस्तानी लष्कराकडून देण्यात आली असून, भारतीय सैन्याने मात्र अधिकृतरित्या हा आरोप फेटाळून लावला आहे. तसेच, भारतीय सैन्याकडून सीमा भागात मोठ्या प्रमाणात तोफगोळे डागले जात असल्याचेही पाकिस्तानने सांगितले आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास कमांडोंनी पाकसीमेत सुमारे अडिचशे मीटर जावून पाकिस्तानी सैन्यावर हल्ला चढविला. भारतीय लष्कराच्या ‘घातक’ कमांडोंनी ही कारवाई केली. वायूवेगाने झालेल्या या कारवाईत पाकिस्तानचे पाच ते सात जवान ठार झाले असावेत, अशी माहिती कमांडोंनी दिली. तर संरक्षण सूत्राच्या माहितीनुसार, लष्करी कमांडोंनी सीमापार गोळीबार करत पाकिस्तानच्या दोन चौक्या उद्ध्वस्त केल्यात. रावळकोट भागात बलुचिस्तान रेजिमेंटचे जवान तैनात असून, त्यापैकी तिघे ठार झाले असल्याचे अधिकृतरित्या सांगण्यात आले. भारताच्या या कारवाईने सीमेवर तणाव निर्माण झालेला आहे.

बुटक्या नूर मोहम्मदला चकमकीत टिपले
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा जम्मू-काश्मीरमधील टॉप कमांडर नूर मोहम्मदला पुलवामामधील चकमकीत ठार करण्यात भारतीय लष्कराला यश आले. नूर मोहम्मद हा वर्षभरात जम्मू-काश्मीरमध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाइंड असून, त्याची उंची अवघी तीन फूट होती. सोमवारी रात्री पुलवामा जिल्ह्यातील संबूरा येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम राबवली. यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीत नूर मोहम्मदचा खात्मा करण्यात आला. तर दुसर्‍या दहशतवाद्याचा शोध सुरु असल्याचे समजते. मंगळवारी सकाळी या दहशतवाद्याची ओळख पटली आहे. नूर मोहम्मद असे त्याचे नाव आहे. घटनास्थळावरुन शस्त्रसाठाही जप्त केल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली.