जळगाव । जिल्हा न्यायालयाच्या मागील गेटजवळ उभ्या असलेल्या वकीलाच्या पाकिटातून भोदूंबाबांनी दोन हजार रूपये चोरून नेली. पैसे चोरीला गेल्याचे लक्षात येताच वकीलाने व सोबत असलेल्या अन्य वकीला साथीदारांनी लागलीच भोंदूबाबांचा पाठलाग करून त्यांना पकडले आणि त्या दोन्ही भोंदूबाबांना शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. यामुळे गोंधळ निर्माण झाला होता.
अॅड. दिलीप गायकवाड हे जिल्हा न्यायालयाच्या मागील गेटजवळ इतर वकील मित्रांसोबत गप्पा मारत उभे होते. त्या दरम्यान, दोन भोंदूबाबा त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी गायकवाड यांना तावीत पाकिटात ठेवण्यास सांगितले. गायकवाड यांनी पाकिट भोंदूबाबांकडे देताच त्यांनी तावीत ठेवण्याच्या बहाण्याने पाकिटातील दोन हजार रुपये चोरले आणि पाकिट गायकवाड यांना देवून खिशात ठेवण्यासाठी सांगितले. मात्र, अॅड. गायकवाड यांनी पाकिट तपासले तर त्यांना त्यातील दोन हजार रुपये चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी लागलीच दोन्ही भोंदूबाबांचा इतर वकील मित्रांच्या मदतीने पाठलाग करून रस्त्यातच पकडले. दोघांना पैसे चोरल्याची विचारपूस केल्यानंतर दोघांनी उडवा-उडवीचे उत्तर दिल्यानंतर अॅड. गायकवाड यांनी दोघांना शहर पोलिस ठाण्यात नेत पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर दिमाग ललव जोगी व किरण जोगी असे दोघांनी त्यांची नावे सांगितली. अखेर त्यांच्याकडून पैसे मिळाल्यानंतर अॅड. गायकवाड यांनी तक्रार दाखल केली. यातच जिल्हा न्यायालयातील समोरच्या बाजूला असलेल्या पार्किंग झोनमधून देखील अॅड. प्रविण पांडे यांचे पाकिट व मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचाही प्रकार घडला आहे.