पाकिस्तानकडून गोळीबार; भारताचा लान्स नायक शहीद

0

नवी दिल्ली: चीनसोबतच आता पाकिस्तानच्या सीमेवर देखील तणाव वाढला आहे. पाकिस्तानकडून सीमेवरील कुरापती सुरुच आहेत. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले असून गोळीबारात भारताचे लान्स नायक शहीद झाले आहेत. करनेल सिंह असे शहीद लान्स नायकांचे नाव आहे. आज गुरवारी सकाळी पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. सकाळपासून पाकिस्तानकडून कृष्णा घाटीमध्ये जोरदार गोळीबार केला जात आहे. यामध्ये लान्स नायक करनेल सिंह शहीद झाले आहेत. तर अन्य एक जवान जखमी झाला आहे. जखमी जवानाला राजौरीच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सैन्यातर्फे शहीद जवानाला मानवंदना देण्यात आली आहे.

पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. सोमवारी पाकिस्तानच्या राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार केला होता. या काळात पाकिस्तानकडून मोर्टार डागण्यात आले होते. यावर भारताकडूनही जोरदार प्रत्यूत्तर देण्यात आले होते.