नवी दिल्ली : पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी दुपारच्या सुमारास आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या केंद्रावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. ग्रेनेडही फेकण्यात आले. बीएसएफच्या जवानांनीही पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले.
सीमेवरील चौकीवर पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार सुरूच होता. तसेच बॉबियान चौकीजळ जवळपास अर्धा डझन ग्रेनेडही फेकण्यात आले. पाकिस्तानी सैन्याकडून या चौकीवर अनेकदा हल्ले करण्यात आले आहेत, अशी माहितीही अधिकार्याने दिली. दरम्यान, या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. गेल्यावर्षी 29 आणि 30 नोव्हेंबरच्या मध्यरात्री पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना समोर आली आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची या वर्षातील ही पहिलीच घटना आहे, अशी माहितीही अधिकार्याकडून देण्यात आली.