श्रीनगर । सीमारेषेवर पाकिस्तानकडून सुरू असलेल्या कुरापती कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही. भारताकडूनही वेळोवेळी त्यांना जशासतसे प्रत्युत्तर देण्यात येते. तरीही पाक सैन्याच्या कुरापतीत अजूनच वाढ होत आहे. नुकतेच पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची घटना समोर आली आहे.
जम्मू-काश्मीरमधील राजौरी सेक्टरमधील सात गावांना यावेळेस पाकने लक्ष्य केले असून सीमारेषेवरील तणावामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भारतीय सैन्यानेही पाकला चोख प्रत्युत्तर दिले आहे. यात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी सीमा रेषेवरील गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची 10 मे पासूनची ही चौथी घटना असून त्यात आतापर्यंत तीन जण ठार झाले असून सहा जण जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकने सात गावांना लक्ष्य केले. यानंतर भारतीय सैन्यानेही पाकला चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने लहान व स्वयंचलित शस्त्रे, तसेच 82 मि.मी. व 120 मि.मी.च्या तोफांचा वापर केला.
चौक्या उद्ध्वस्त
पाकिस्तानकडून वारंवार होत असलेले शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारतीय शहीद जवानांच्या मृतदेहांची केलेली विटंबना अशा गोष्टींचा भारतातर्फे वचपा काढण्यात आला आहे. भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत सीमारेषेवरील पाकच्या चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. टाइम्स नाऊच्या माहितीनुसार या चौक्यांना लक्ष्य करण्यासाठी भारताने अँटी टँक गायडेड मिसाईल्सचा वापर केल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय सैन्याकडून या कारवाईचा एक व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात आला. या व्हिडिओत भारतीय लष्कराने पाकिस्तानी चौक्यांवर तब्बल सात क्षेपणास्त्रे डागल्याचे दिसत आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी बंकर्स पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचेही दिसत आहे.