नवी मुंबई । पाकिस्तानी अतिरेक्यांनी अमरनाथ यात्रेकरुंवर केलेल्या भ्याड हल्याच्या निषेर्धात पाकिस्तानच्या झेंड्याची होळी करणार्या सात शिवसेना पदाधिकार्यांना वाशी पोलिसांनी अटक केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे शिवसेनेत संतापाची लाट पसरली आहे. शिवसेना शहरप्रमुख विजय माने, उपशहर प्रमुख गणपत शेलार, संतोष मोरे, नवी मुंबई महिला शहर अध्यक्ष रंजना शिंत्रे, परिवहन समिती सभापती समीर बागवान व माजी विरोधी पक्ष नेते दिलीप घोडेकर अशी अटक करण्यात आलेल्या शिवसेना पदाधिकार्यांची नावे आहेत. जुलै 2017 मध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांनी अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला केला असता त्यांच्या या हल्याच्या निषेर्धात सबंध भारतात खळबळ माजली होती.
त्याचवेळी भारताच्या विविध भागात पाकिस्तानच्या या कृत्याचा निषेध करण्यात येत होता. त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील शिवसेना नेत्यांनी 11 जुलै रोजी पाकिस्तानचा निषेध करत त्यांच्या झेंड्याची वाशी शिवाजी चौकात होळी केली होती. त्याच वेळी पाकिस्तान देशाचा झेंडा जाळल्या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात शिवसेना नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या नंतर तब्बल 5 महिन्यानंतर या सर्व शिवसेना नेत्यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. अटक करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने सर्वांची जामिनावर मुक्तता केली आहे.