पाकिस्तानची भूमिका : लष्करप्रमुख, राष्ट्रपतींकडे अपिल करता येणार

0

नवी दिल्ली : भारतीय नौदलाचे माजी कमांडर कुलभूषण जाधव यांना तातडीने फासावर लटकविले जाणार नाही, अशी ग्वाही पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी दिली. पाकिस्तानी कायद्यानुसार त्यांना तीनवेळा अपिल करण्याची संधी आहे. त्यांना पुरेशी कायदेशीर संधी दिली जाईल, असेही आसिफ यांनी म्हटल्याचे वृत्त डॉन या पाकिस्तानातील आघाडीच्या वृत्तपत्राने दिले आहे. पाकिस्तानच्या संसदेत बोलताना आसिफ यांनी हे आश्‍वासन दिले. जाधव यांना 40 दिवसांत लष्करप्रमुखांकडे मृत्युदंडाविरुद्ध अपिल करता येईल. त्यानंतरही त्यांना राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करता येईल, असेही आसिफ यांनी सांगून, जाधव यांना तातडीने फासावर लटकविले जाण्याची शक्यता फेटाळून लावली. पाकिस्तानविरोधात भारताने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पाकिस्तान थोडा नरमला असल्याचे दिसून येते आहे.

जाधव यांच्याकडे 40 दिवस!
भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या मृत्युदंडावरून भारताने पाकिस्तानला कालच खणखणीत इशारा दिला होता. जाधव यांना फासावर लटकवले तर गंभीर परिणाम भोगावे लागतील. जाधव यांना वाचविण्यासाठी वाट्टेल ते करू, अशी धमकीच भारताच्या परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला दिली होती. त्यानंतर अमेरिकन संरक्षणतज्ज्ञांनीदेखील पाकिस्तानला भारताच्या भूमिकेवरून सावध केले होते. त्यामुळे पाकिस्तानने जाधव यांना तातडीने फासावर लटकविले जाणार नाही. त्यांना 40 दिवसांत लष्करप्रमुख व नंतर राष्ट्रपतींकडेही दाद मागता येईल, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. जाधव यांना झालेली शिक्षा कायद्यानुसारच असल्याचेही पाकच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय समूहाने दबाव वाढविला
कुलभूषण जाधव हे गुप्तहेर नसून, ते व्यावसायिक आहेत व त्यांना पाकिस्तानने इराणमधून अपहृत केले आहे, असा आरोप भारताकडून करण्यात आला आहे. त्यांच्याकडे भारताचा वैध पासपोर्ट असून, 46 वर्षीय जाधव यांना फाशी देण्यात आली तर तो भारताच्या नागरिकाचा पूर्वनियोजित खून ठरेल, असा इशारा कालच सुषमा स्वराज यांनी दिला होता. त्यामुळे याप्रश्‍नी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण झालेला आहे. भारत-पाकिस्तानातील संबंध या फाशीमुळे प्रचंड बिघडतील, असा धोक्याचा इशाराही जागतिक समूहाने पाकिस्तानला दिलेला आहे. पाकिस्तानने जाधव यांच्याबरोबर न्यायोचित भूमिका घेतली नाही तर भारतीय उच्चायुक्तांना पाकिस्तानातून परत बोलाविणे व पाकिस्तानी उच्चायुक्तांची देशातून हकालपट्टी करणे असे पाऊलही भारत उचलू शकतो, अशी माहितीही वरिष्ठस्तरीय सूत्राने दिली.