पाकिस्तानची सर्व सूत्रे इम्रान खान यांच्या हाती!

0

इस्लामाबाद । पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या ’तहरीक-ए-इन्साफ’ पक्षाने सर्वाधिक जागा पटकावून आघाडी घेतल्याने पाकमध्ये सत्तापालट निश्‍चित मानली जात आहे. त्यामुळे पाकिस्तानची पुढची सूत्रे इम्रान खान यांच्या हातात जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीच्या एकूण 342 पैकी 272 जागांसाठी झालेल्या मतदानात इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाला सर्वाधिक 113 जागा मिळाल्या आहेत. इम्रान खान यांचा पक्ष बहुमतापासून अवघ्या 24 जागांनी दूर असून, आणखी काही जागांचे निकाल यायचे बाकी असल्याने इम्रान खान बहुमताचा आकडा गाठतील, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. या निवडणुकीत माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाला अवघ्या 64 जागा मिळाल्याने शरीफ यांना मोठा धक्का बसला आहे. तर बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला 43 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर एमक्यूएमला 5 आणि एमएमएला अवघ्या 9 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत पाकिस्तानी जनतेने अनेक दिग्गजांना घरचा रस्ता दाखवला आहे.

पाकिस्तानची नॅशनल असेम्ब्ली एकूण 342 सदस्यांची आहे. त्यापैकी 272 सदस्य थेट लोकांमधून निवडले जातात. तर बाकीच्या 60 जागा महिलांसाठी आणि 10 जागा धार्मिक अल्पसंख्याकांसाठी राखीव आहेत.