पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांचा पक्षप्रमुख पदाचा राजीनामा

0

इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांनी ऑल पाकिस्तान मुस्लिम लिग (एपीएमएल) च्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. पेशावर उच्च न्यायालयाने त्यांना राजकारणापासून आजीवन अपात्र ठरवल्यामुळे मुशर्रफ यांनी एपीएमएलच्या प्रमुख पदाचा राजीनामा पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे, अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष डॉ.मोहम्मद अमजद यांनी दिली.

” सर्वोच्च न्यायालयात उपस्थित होईपर्यंत मला अटक करण्याच्या आदेशाने मला माझ्या परताव्या बद्दलच्या योजनांचा पुनर्विचार करण्यास भाग पाडले आहे. मला अटक केल्याने देशाला काहीच फायदा होणार नाही. संपुर्ण जगाला माहिती आहे कि मी भित्रा नाही आहे. पण मी परतण्यासाठी च्या योग्य वेळेची वाट पाहत आहे.” मंगळवारी मुशर्रफ सर्वोच्च न्यायालयासमोर उपस्थित न झाल्याने निवडणूक आयोगाने २५ जुलैच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी त्यांचा एनए-४ चित्राल सीटची उमेदवारी अर्ज फेटाळला होता. पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती साकिब निसार यांनी मुशर्रफ यांना पाकिस्तानला परत येण्याचे आदेश दिला होता आणि १४ जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते, परंतु मुशर्रफ अपयशी ठरले.

मार्च २०१६ पासून पाकिस्तानमधून बाहेर गेलेले मुशर्रफ आता दुबईत राहतात. त्यांनी २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयात २०१३ च्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. एपीएमएलच्या केंद्रीय कार्यकारी समितीने डॉ. मोहम्मद अमजद यांची पक्षाचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड केली आहे, तर मेह्रीन मलिक अॅडम हे एपीएमएलचे महासचिव असतील. मुशर्रफ पक्षाचे सर्वोच्च नेते राहतील. मुशर्रफ यांनी एपीएमएलची स्थापना २०१० मध्ये केली होती. ७३ वर्षीय मुशर्रफ यांनी पाकिस्तानवर ९ वर्ष (१९९९-२००८) सत्ता केली. त्यांच्यावर अनेक न्यायालयीन प्रकरणे चालु आहेत ज्यात २००७ मधील माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या कथित हत्येचाही समावेश आहे. अशा प्रकरणांमुळे ते २०१३ ची निवडणूक लढवू शकले नव्हते.