पाकिस्तानच्या गोळीबारात एकाचा मृत्यू

0

कठुआ-पाकिस्तानने बुधवारी पुन्हा एकदा भारतीय सीमारेषेवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला आहे. जम्मू-काश्मीरमधील कठुआ शहरातील हिरानगर येथे झालेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. भारतीय जवानांकडून या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यात येत आहे. मंगळवारी करण्यात आलेल्या गोळीबारात एका ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेसहित दोन जण जखमी झाले होते. सीमेनजीकची स्थिती पाहून गावातील लोकांना सरकारी शिबिरात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

या गोळीबारामुळे घरांचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानकडून अखनूर ते सांबापर्यंतच्या सर्वच ठिकाणी गोळीबार केला जात आहे. जम्मूचे पोलीस महानिरीक्षक एस डी सिंग जमवाल यांनी अरनिया सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात एक व्यक्ती जखमी झाल्याचे सांगितले. आता दोन्ही बाजूने गोळीबार सुरू आहे. मंगळवारी पाकिस्तानच्या गोळीबारात अरनिया सेक्टरमधील पिंडी गावातील रहिवासी मदनलाल भगत यांच्या घरावरील छप्पर उडून गेले होते. गोळीबार होत असलेल्या भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे जमवाल यांनी सांगितले. जम्मूचे विभागीय आयुक्त हेमंतकुमार शर्मा म्हणाले की, आरएस पुरा येथे सुरक्षित ठिकाणी मदत शिबीर सुरू करण्यात आले आहेत. अरनिया सेक्टरमध्ये मदत शिबीर सुरू आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या शिबिरांमध्ये शेकडो लोकांनी आसरा घेतला आहे.