वॉशिंग्टन : पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानच्या नव्या सरकारला अमेरिकेने जोरदार झटका दिला आहे. अमेरिकी लष्कराने पाकिस्तानला देण्यात येणारी ३० कोटी डॉलर्सची (२,१३० कोटी रुपयांहून अधिक) मदत रद्द केली आहे. दहशतवादविरोधात कारवाई करण्यात पाकिस्तान निष्फळ ठरल्याने ही मदत रोखण्यात आली आहे. अमेरिकेशी पाकिस्तानचे संबंध आधीच तणावपूर्ण आहेत, त्यात या नव्या निर्णयानंतर ते आणखी बिघडण्याची शक्यता आहे.
‘कोअॅलिशन सपोर्ट फंड’ या नावाने मिळणारी ही रक्कम त्या मोठ्या निधीचा भाग आहे ज्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर्षीच्या सुरुवातीला काट मारली आहे. पाकिस्तान मदतीच्या बदल्यात केवळ फसवणूक करतो, असा आरोप ट्रम्प यांनी केला होता.
पाकिस्तान दहशतवाद्यांना सुरक्षित आसरा देतो, असा ट्रम्प सरकारचा आरोप आहे. अमेरिका पाकिस्तानचा शेजारी देश अफगाणिस्तानाविरोधात गेली १७ वर्षे लढत आहे. पण पाकिस्तानात अतिरेकी लपून बसत असल्याने अमेरिकेला ते मोठं आव्हान होऊन बसलं आहे. पाकिस्तानने मात्र अमेरिकेच्या आरोपांचा इन्कार केला आहे.