कराची : पाकिस्तानातील कराची येथे चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यामध्ये दुतावासाबाहेर तैनात असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यानंतर झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले आहे. या घटनेनंतर कराचीत बंदोबस्त वाढवण्यात आला असून चीन दुतावासातील अधिकारी व कर्मचारी सुखरुप आहेत.
कराचीतील क्लिफ्टन ब्लॉक – ४ येथे चीनचे दुतावास आहे. शुक्रवारी सकाळी तीन दहशतवाद्यांनी दुतावासात घुसण्याचा प्रयत्न केला. एका कारमधून हे तिन्ही दहशतवादी दुतावासाच्या आत घुसण्याचा प्रयत्न करीत होते. दुतावासाबाहेर तैनात असलेल्या सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी ही कार थांबवण्याचा प्रयत्न केला. कारमधील दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या दिशेने गोळीबार केला. यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.
सुरक्षा दलांनीही दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले. सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात तिन्ही दहशतवादी ठार मारले गेले. कारमध्ये स्फोटक पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आले. पोलिसांनी शस्त्रसाठा आणि बॉम्ब जप्त केले असून या घटनेनंतर चीन दुतावासाबाहेरील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सध्या दुतावास खाली करण्यात आले असून दुतावासाकडे जाणारे सर्व मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत. दुतावासातील सर्व अधिकारी व कर्मचारी सुरक्षित असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.