पाकिस्तानला दहशतवादी देश ठरवणारे पहिले पाऊल

0

नवीदिल्ली : सईद हाफ़ीजला नाटक म्हणून दिखावू अटक केल्यानेही पाकिस्तानच्या समस्या संपलेल्या नाहीत. व्हिसा नाकारायच्या यादीत ट्रंप प्रशासनाने पाकचे नाव घातलेच होते. पण आता अमेरिकन नागरिकांनी पाकिस्तानात फ़िरकू नये, कारण तिथे दहशतवादाचे अड्डे असल्याचा इशाराच त्या देशाच्या सरकारने दिला आहे. त्यातच पाकिस्तानचे माजी सुरक्षा सल्लागार दुर्रानी यांनी मुंबई हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याची जाहिर कबुलीच दिल्याने पाकची आणखीनच कोंडी झाली आहे. कारण अशीच वाटचाल होत राहिली, तर अमेरिका व राष्ट्रसंघ पाकिस्तानला दहशतवादी देश म्हणून घोषित करण्याची शक्यता वाढली आहे.

कुठल्याही देशाला वा तिथल्या सरकारच्या कृत्यांना राष्ट्रसंघाने दहशतवादी घोषित केल्यास त्यांच्यावर शस्त्रास्त्रे वा व्यापारी आर्थिक निर्बंध लागू होतात. त्यामुळे जगभर त्या देशाला मुक्तपणे व्यापार व्यवहार करता येत नाही. अनेक आवश्यक गोष्टींची आयातही होऊ शकत नाही. पाकिस्तानला तशा कोंडीत पकडण्याचे डाव भारताने गेल्या दोन अडीच वर्षापासून सातत्याने चालविले आहेत. त्याला आता फ़ळे येऊ लागल्याचीच ही लक्षणे आहेत. गतवर्षी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावर आक्रमक भाषण केल्यावर त्यांना जबरदस्त प्रतिसाद मिळाला होताच. त्यानंतर ह्या दिशेने हालचाली सुरू झाल्या होत्या.

ट्रंप अध्यक्षपदी निवडून आल्यावर पाकिस्तान विरोधातल्या डावपेचांना वेग आला होताच. त्याची सुरूवात हाफ़ीजच्या अटकेने झाली होती आणि आता तर पाकिस्तानच प्रवासाला धोकादायक देश असल्याचा इशारा देऊन अमेरिकेने काही संकेत दिले आहेत. त्याचा परिणाम तिथल्या राज्यकर्ते व अधिकार्‍यांवरही दिसू लागला आहे. म्हणून हळुहळू दुर्रानीसारखे पोपटही सत्य बोलायचे धाडस करू लागले आहेत. आता लौकरात लौकर जिहादी संघटनांच्या मुसक्या बांधून हा उद्योग संपवणे, किंवा त्यांच्यासोबत दिवाळखोरीत जाणे, इतकेच पाकच्या हाती शिल्लक राहिल.