पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयासाठी अमेरिकेला आनंद ; भारताला शुभेच्छा

0

मुंबई : आशिया चषक स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. संपूर्ण जगातील क्रिकेट चाहत्यांचं भारत-पाकिस्तान मध्ये होणाऱ्या या सामन्यावर लक्ष होतं. पाकिस्तानवर मिळवलेल्या या विजयावर भारतालाच नाही तर अमेरिकेला देखील आनंद झाला आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत केन जस्टर यांनी भारताला विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विट करत म्हटलं की, पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयासाठी अभिनंदन टीम इंडिया. आशिया चषकातील आगामी सामान्यांसाठी शुभेच्छा.

अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी पाकिस्तानला अनेक धक्के दिले असून पाकिस्तानला दिली जाणारी आर्थिक मदत देखील बंद केली आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावर देखील त्यांनी पाकिस्तानला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. भारताचे अमेरिकेसोबत संबंध सुधारले आहेत. त्यामुळे केन जस्टर यांनी जराही वेळ न घालवता भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या वर्षीच केन जस्टर यांची नियुक्ती केली आहे.

पाकिस्तानने टॉस जिंकत आधी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पण भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या संघाला 162 रनवर ऑल आऊट केलं. भारताने 2 विकेट गमवत पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला.