पाकिस्तानविरुद्ध भारताचे पारडे जड

0

लंडन । महिला विश्‍वचषक स्पर्धेत रविवारी भारताचा मुकाबला परंपरागत प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे. इंग्लंडमध्ये खेळल्या जात असलेल्या स्पर्धेत सलग दोन सामने जिंकल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्‍वास वाढला आहे. याउलट परिस्थिती पाकिस्तानची आहे. स्पर्धेतील पहिले दोन्ही सामने पाकिस्तान हरलेली आहे. त्यात पुरुषांप्रमाणे पाकिस्तानच्या महिलांनाही विश्‍वचषक स्पर्धेत भारतावर अद्याप विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे महिला विश्‍वचषक स्पर्धेतील या 11व्या सामन्यात भारताचेच पारडे जड राहू शकते. एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय महिलांनी पाकिस्तानला कधीच डोके वर काढण्याची संधी मिळू दिलेली नाही. 2005 ते 2017 या कालावधीत उभय संघामध्ये एकूण 9 सामने झालेत. त्यात सर्व सामने भारताने जिंकले आहेत. याशिवाय 2009 आणि 2013मध्ये झालेल्या विश्‍वचषक स्पर्धेतील सामनेही भारतानेच जिंकले आहेत. पाकिस्तानविरुद्धचे भारताचे सर्वच सामने एकतर्फी ठरले. भारताने पाकिस्तानवर आतापर्यंत 7 विकेट्स, 6 विकेट्स, 10 विकेट्स, 207 धावा, 182 धावा, 103 धावा, 80 धावा, 10 विकेट्स आणि 193 धावांनी विजय मिळवला आहे. अनुभवाबाबतीतही भारतीय संघ पाकिस्तानच्या तुलनेत खूप पुढे आहे.

सातत्यपूर्ण कामगिरीची आशा
साखळी स्पर्धेतील दोन्ही सामने जिंकलेल्या भारतीय संघाचा आत्मविश्‍वास दुणावलेला असेल यात शंका नाही. पण तरीसुद्धा भारतीय संघाला पाकिस्तानला नजर अंदाज करून चालणार नाही. कर्णधार मिताली राज, सलामीला येणारी स्मृती मंधाना, पूनम राऊत यांच्यावर संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी असेल. यष्टिपाठी सुषमा वर्माला खूपच काळजी घ्यावी लागेल. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सुषमाने यष्टिचित करण्याच्या दोन संधी सोडल्या होत्या

पाकिस्तानची चौथी विश्‍वचषक स्पर्धा
भारताने एकदिवसीय सामन्यात पदार्पण केल्यानंतर 19 वर्षांनंतर 1997 मध्ये पाकिस्तानने पहिला एकदिवसीय सामना खेळला. भारतीय महिला संघाची ही नववी विश्‍वचषक स्पर्धा आहे, तर पाकिस्तानी महिला संघ चौथ्यांदा विश्‍वचषक स्पर्धेत खेळत आहे. भारतीय महिलांनी 1978 मध्ये पहिल्यांदा विश्‍वचषक स्पर्धेत सहभाग घेतला.2013 चा अपवादवगळता 1993 नंतर भारताने प्रत्येक वेळी उपांत्य फेरीत स्थान मिळवलेले आहे. सन 2005 मध्ये अंतिम फेरीत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला होता. याउलट पाकिस्तानला कधीच अंतिम चार संघांमध्ये जागा मिळवता आलेली नाही. 2009 मध्ये हा संघ सहाव्या क्रमांकावर होता. ही त्यांची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.