पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या बीएसएफ जवानाला अटक

0

नवी दिल्ली – पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या बीएसएफच्या एका जवानाला अटक करण्यात आली आहे. पंजाबच्या फिरोजपूरमधील ममदोट पोलीस स्टेशनमध्ये बीएसएफच्या 29व्या बटालियनमध्ये ऑपरेटरचे काम करणारा जवान शेख रियाजउद्दीनविरोधात हेरगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रियाजुद्दीन हा महाराष्ट्रातील मूळचा लातूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे म्हटले जात आहे.

लिखित स्वरुपात तक्रार मिळाल्यानंतर शेख रियाजुद्दीनला बेड्या ठोकण्यात आल्या. पोलिसांनी त्याच्याकडील दोन मोबाइल फोन आणि तब्बल सात सिमकार्ड्सही जप्त केले आहेत. शेख रियाजुद्दीननं सीमारेषेजवळील रस्त्यांचे व्हिडीओ आणि बीएसएफ युनिटमधील अधिकाऱ्यांचे मोबाइल क्रमांक पाकिस्तानातील हस्तकांसहीत शेअर केले. फेसबुक, फेसबुक मेसेंजर आणि मोबाइलच्या माध्यमातून सूचना एक ऑपरेटर मिर्झा फैसलसहीत शेअर करत होता.

अटक करण्यात आलेल्या बीएसएफ जवानाला आज रविवारी कोर्टासमोर सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये सतर्कतेचा इशारा जारी करण्यात येईल.