इस्लामाबाद : पाकिस्तानी कायदे मंत्र्यांच्याविरोधात आंदोलन करणार्या आंदोलकांवर पोलिस व अर्धसैनिक सैन्यदलाच्या जवानांनी बळजबरी सुरु करताच, अहिंसक मार्गाने सुरु असलेले आंदोलन शनिवारी अचानक हिंसक झाले. राजधानी इस्लामाबादेत आंदोलकांनी राजमार्ग रोखला. या आंदोलकांना हटविण्यासाठी पोलिस व सुरक्षा जवानांनी आक्रमक पवित्रा घेताच हजारोंच्या संख्येने असलेल्या जमावाने हिंसक पवित्रा घेत त्यांच्यावर हल्ले सुरु केले. या हल्ल्यात एक जवान ठार झाला असून, 170 जण गंभीर जखमी झाले आहेत. जमावाने पाकिस्तानचे कायदेमंत्री जाहीद हमीद यांच्यावरदेखील हल्ला केला. या हिंसक आंदोलनामागे भारताचा हात असल्याचा आरोप गृहमंत्री एहसान इकबाल यांनी केला आहे. जमावाच्या प्रत्युत्तरानंतर सरकारने आपले अर्धसैनिक दल मागे घेत आंदोलकांचे अटकसत्र थांबविले होते. तरीही रात्री उशिरापर्यंत पाकिस्तानात ठीकठिकाणी जाळपोळ व सुरक्षा यंत्रणांवर हल्ले सुरुच होते.
निवडणूक कायद्यातील सुधारणांवरून संताप
केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये पारित केलेल्या निवडणूक सुधारणा कायद्याविरोधात पाकिस्तानात संताप खदखदत आहे. तेव्हापासून तहरीक-ए-खत्म-ए-नबवूत, तहरीक-ए-लबैक वा रसूल अल्लाह (टीएलवायआर) आणि सुन्नी तहरीक पाकिस्तान (एसटी) या संघटनांच्यावतीने अहिंसक आंदोलन सुरु होते. शुक्रवारी गृहमंत्री एहसान इकबाल यांच्याविरोधात इस्लामाबाद उच्च न्यायालयाने अवमानना नोटीस जारी केली होती. त्यानंतर या आंदोलनाने जोर पकडला. आंदोलकांनी राजमार्ग अडविल्याने सरकारची अभूतपूर्व कोंडी झाली होती. त्यातच इस्लामाबाद शहर न्यायालयाने आंदोलकांना सक्तीने हटविण्याचे आदेश जारी केले. त्यामुळे पोलिस व अर्धसैनिक दलाने आक्रमक कारवाई होती घेतली. त्यामुळे खवळलेल्या हजारो आंदोलकांनी सुरक्षा जवानांवर हल्ले चढविले. पोलिसांनीही आंदोलकांवर गोळीबार करत अश्रुधुराचे नळकांडे डागले. त्यामुळे आंदोलकांनी जाळपोळ सत्र सुरु केले. शनिवारी दिवसभर हे हिंसक आंदोलन सुरु होते. आंदोलकांची आक्रमकता पाहाता रात्री उशिरा पाकिस्तान सरकारने आपली कारवाई थांबवत असल्याची घोषणा केली. तरीही इस्लामाबादसह ठीकठिकाणी हिंसक आंदोलन सुरुच होते.
प्रसारमाध्यमांवर लादले निर्बंध
आंदोलकांनी गृहमंत्री इकबाल व कायदेमंत्री जाहीद हमीद यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. या हिंसक आंदोलनाचे प्रसारण प्रसारमाध्यमांनी करू नये, यासाठी पाक सरकारने बंदी घातली होती. तरीही जिओसह अनेक वाहिन्यांनी या हिंसाचाराचे लाईव्ह प्रसारण केले. वाहिन्यांच्या वृत्तानुसार दोन हजार आंदोलकांवर आठ हजार जवानांनी हल्लाबोल केला होता. त्यात अनेक आंदोलक आणि सुरक्षा जवानही गंभीररित्या जखमी झाले आहेत. तसेच, मृतकांचा आकडाही मोठा असण्याची शक्यता आहे.