लाहोर । पाकिस्तानमध्ये तेलाच्या टँकरचा भीषण अपघात झाला असून, त्याच्या आगीत 123 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. येथील पंजाब प्रांतातील बहावलपूर जिल्ह्यामधील महामार्गावर एक तेलाचा टँकर अपघातग्रस्त झाला. त्यात 100 पेक्षाही अधिक जण जखमी झाले आहेत. अपघात झालेल्या टँकरमधून गळत असलेले तेल घेण्यासाठी येथे नागरिकांची गर्दी जमली होती. यावेळीच अचानक आग भडकल्याने मोठी प्राणहानी झाली.
सहा मोठ्या गाड्या व 12 दुचाकी जळून राख
हा टँकर लाहोर येथून कराची येथे जात होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. येथील गावकर्यांनी त्वरित टँकरमधून गळणारे तेल मोठ्या कॅनमधून गोळा करण्यास सुरुवात केली. परंतु, आग भडकल्यामुळे अनेक नागरिक अक्षरश: जळून ठार झाले. या अपघातामध्ये सहा मोठ्या गाड्या व 12 दुचाकी वाहनांचीही जळून राख झाली.
लष्कराकडूनही मदतकार्य
जखमींना येथील जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी राबवत येणार्या मदतकार्यास लष्कराकडूनही साहाय्य करण्यात आले. या घटनेचा अहवाल देण्याचे निर्देश पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याकडून येथील राज्य सरकारला देण्यात आले आहे.