वॉशिंग्टन । भारतावर दडपण आणण्यासाठी चीन पाकिस्तानात लष्करी तळ उभारणार असल्याचे अमेरिकेचे लष्करी मुख्यालय असलेल्या पेंटागॉनच्या एका अहवालात म्हटले आहे. चीनने पाकिस्तानात लष्करी तळ उभारल्यास भारताची डोकेदुखी वाढणार असणार असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. भारताला जमीन आणि समुद्रात घेराव घालण्याच्या दृष्टीने चीनचे प्रयत्न सुरू आहेत. याआधी चीनने हिंदी महासागराशी जोडलेल्या अनेक देशांमधील बंदरांच्या विकासाचे काम सुरू केले आहे. याशिवाय त्यांचा इकॉनॉमी कॉरिडोर पाकिस्तानातून जाणार आहे. अशा परिस्थितीत भारताला सिमेवर चीनपासून धोका निर्माण होऊ शकतो. याआधी चीनने आफ्रिका खंडातील जिबोटी देशात आपला लष्करी तळ उभारलेला आहे. पेंटागॉनने मंगळवारी अमेरिकेच्या संसदेत 97 पानांचा एक अहवाल सादर केला. चीनने 2016 मध्ये लष्करासाठी 140 अब्ज डॉलर्सची तरतूद केली होती. पण त्यांचा खर्च 180 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाला आहे. जिबोटी हा देश हिंदी महासागर आणि लाल सागरच्या खूपच जवळ असल्यामुळे त्यांना वेगवान हालचाल करता येणार आहे असे या अहवालात स्पष्ट केले आहे. पाकिस्तान चीनकडून मोठ्या प्रमाणात हत्यारांची खरेदी करतो. चीनने 2011 ते 2016 दरम्यान 12 खरब हत्यारांची निर्यात केली आहे. त्यात पाकिस्तानचा वाटा 6 खरब रुपयांचा होता. गेल्यावर्षी पाकिस्तानने चीनकडून आठ पाणबुड्या खरेदी करण्याच्या कराराकडे या अहवालात लक्श वेधण्यात
आले आहे.
स्टिंग ऑफ पल्स
परराष्ट्र व्यवहारातील विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार चीन सध्या स्टिंग ऑफ पल्स या योजनेवर काम करत आहे. या योजनेनुसार चीन सध्या पाकिस्तानातील ग्वादर, मालदीवमधील मारो, श्रीलंकेतील हम्बनटोटा, बांगलादेशातील चितगाव, म्यानमारमधील सित्तबय, थायलंडमधील क्रॉनहर पोर्ट याबंदरांचा अतिशय वेगाने विकास करत आहे. याशिवाय श्रीलंकेतील कोलंबो बंदरही चीनला मिळणार असल्याचे वृत्त आहे. भारताच्या पूर्व आणि पश्चिम भागात हिंदी महासागर आहे. त्यामुळे या महासागरातील दुसर्या देशांच्या बंदरांचा विकास करून चीन भारताला घेरत आहे.
भारताचे संभाव्य नुकसान
विविध देशांमधील बंदरांचा विकास, वन बेल्ट वन रोड प्रोजेक्ट आणि लष्करी तळ उभारून चीन भारताला तीन बाबींमध्ये अडचणीत आणू शकतो.
आर्थिक : हिंदी महासागरातील बंदरांचा विकास केल्यावर भारताच्या शेजारील देशांशी चीनला कमी वेळात संपर्क साधता येणार आहे. याशिवाय सागरी मार्गे त्यांच्या मालाची सहजतेने वाहतूक करता येणार असल्यामुळे चीनला आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होऊ शकतो.
कुटनीती : भारतीय उपखंडात पाकिस्तानचा आर्थिक आणि लष्करी दबदबा वाढणार असल्याने भारताला शेजारील देशांशी संबध मजबूत करण्यासाठी नव्याने रणनीती आखावी लागणार आहे. उद्योग आणि लष्करी ताकद वाढल्याने चीन या देशांना नेहमीच मदत करत राहणार आहे.
सीमांचे रक्षण : भारताला आता इतर देशांशी रक्षा रणनीती आखावी लागणार आहे. पाकिस्तानसह इतर देशांना चीन मोठ्या प्रमाणात कर्ज देत आहे. त्यामुळे चीन या देशांचा भारताच्या विरोधात वापर करणार हे निश्चित आहे. त्यामुळे सीमेवर भारताला आता अधिक दक्ष राहावे लागेल.
चीनची आक्रमक योजना
अनेक देशांच्या बंदरांचा विकास करून चीन एकाच वेळी हिंदी महासागर आणि भूमध्य सागरावर ताबा मिळवण्याचे प्रयत्न करत आहे. आता पाकिस्तानात लष्करी तळ उभारून भारतावरचा दबाव वाढवण्याबरोबर मध्य आशियावर चीनला आपली पकड बसवायची आहे. या विभागात सैन्यबळ वाढल्यावर चीन त्याचा राजनैतिक फायदा उचलू शकतो. चीन आफ्रिकेतील जिबोटी बंदराचाही विकास करत आहे. हे बंदर पाकिस्तानातील ग्वादर बंदरांशी जोडण्याचा त्यांची योजना आहे. ज्याप्रमाणे श्रीलंकेला मोठ्या प्रमाणात कर्ज देऊन त्यांना आपले अंकित केले आहे, तीच खेळी चीन सध्या पाकिस्तानात खेळत आहे.