पाकिस्तानात परराष्ट्र सचिवपदी पहिल्यांदाच महिला प्रतिनिधी

0

इस्लामाबाद । पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवपदी प्रथमच महिलेची निवड करण्यात आली आहे. तेहमिना जंजुआ असे त्यांचे नाव असून त्या एजाज अहमद चौधरी यांची जागा घेतील. याआधी, भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित हे परराष्ट्र सचिव होतील, असे वृत्त होते. परंतु, तेहनिमा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मार्चच्या पहिल्या आठवड्यात त्या पदभार स्वीकारणार आहेत. इस्लामाबादच्या कायदे आझम या विद्यापीठातून तसेच न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. 2015 पासून त्या संयुक्त राष्ट्रामध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करत आहेत. राजधानी तसेच परराष्ट्रातही सेवा करण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 2011 मध्ये त्या पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या होत्या. 2011 ते 2015 या काळात त्या पाकिस्तानच्या इटलीमधील राजदूत होत्या.