पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राइक पार्ट 2 करा

0

मुंबई । सोमवारी पाकिस्तानी रेंजर्सनी भारतीय जवानांची शीर कलमं केल्यानंतर भारतीय सैन्यांनेही जशास तसे उत्तर देताना नियंत्रण रेषा पार करून दोन पाकिस्तानी चौक्या उदध्वस्त करून सात पाकिस्तानी रेंजर्सना मारले. केंद्र सरकारने सीमारेषेवर भारतीय सैन्याला पूर्ण सूट दिली असून भारतीय लष्कराने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मेंढरमधील त्या घटनेनंतर पाकिस्तान विरुद्ध सर्जिकल स्ट्राइक पार्ट 2 करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सैन्यात आणि देशात पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाट उसळलेली असल्यामुळे अनेक निर्णयांनी केंद्र सरकार पाकिस्तानला कठोर संदेश देऊन, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांना एकटे पाडू शकते. पाकिस्तानविषयी असलेल्या तज्ज्ञांनी सात निर्णयांनी भारत सरकार पाकिस्तानला धडा शिकवता येईल असे सांगितले.

फुटीरवाद्यांविरुद्ध कडक कारवाई करा
पाकिस्तानच्या इशार्‍यावर नाचणार्‍या काश्मीरमधील फुटीरवाद्यांवर कडक कारवाई करुन सरकार पाकिस्तानच्या काश्मीरविषयक धोरणांना अडथळा आणू शकते. याशिवाय पॅलेटगनसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात देशाशी निष्ठा न राखणार्‍या फुटीरवाद्यांशी चर्चा करणार नसल्याचे केंद्र सरकारने याआधीच स्पष्ट केले आहे.

काश्मिरी ब्राह्मणांना परत बोलवा
काश्मिरी ब्राह्मणांना काश्मीरमध्ये परत बोलावून फुटीरवाद्यांना चोख प्रत्युत्तर देता येईल. काश्मीरमध्ये सत्तेत असलेली पीडीपीचे सरकार केंद्र सरकार काश्मिरी ब्राम्हणांसाठी बांधत असलेल्या वेगळ्या रहिवासी संकुलाला विरोध केला आहे. हा विरोध असाच कायम राहिला, तर केंद्र सरकारने राज्यात राज्यपाल शासन आणून काश्मिरी पंडितांसाठी असलेल्या या योजनेला मूर्तस्वरूप देऊ शकते.

बलुचिस्तानचा मुद्दा तापवणे
पाकिस्तान काश्मीरमध्ये खेळत असलेल्या प्रॉक्सी वॉरला उत्तर म्हणून भारताने बलुचिस्तानचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर तापवण्याचा निर्णय घ्यावा. याशिवाय गिलगीट- बाल्टीस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या पाकिस्तान विरोधकांना समर्थन देऊन पाकिस्तानला अडचणीत आणता येऊ शकेल. भारताच्या पाठिंब्यामुळे पाकिस्तानला 1971 मध्ये बांगलादेशला गमवावे लागले होते.

पाकिस्तानला अतिरेकी देश घोषित
भारत सरकारने पाकिस्तानला अतिरेकी देश घोषित करून जागतिक पातळीवर त्यांना वेगळे पाडण्यासाठी मोहीम राबवावी. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी भारत दौर्‍यात भारताविरुद्धच्या प्रॉक्सी वॉरवरून पाकिस्तानला खूप काही सुनावले आहे.

विशेष दर्जा रद्द करा
पाकिस्तानला अतिरेकी देश म्हणून घोषीत करण्याबरोबर त्या देशाला देण्यात आलेला विशेष राष्ट्राचा दर्जा रद्द करा, अशी मागणी आता होऊ लागली आहे. याशिवाय पाकिस्तानशी होत असलेला व्यापार बंद करणे आणि व्हिसा देण्यावर निर्बंध आणा.

सर्जिकल स्ट्राइक पार्ट 2
उरी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून अतिरेक्यांविरुद्ध सर्जिकल स्ट्राइक केले होते. त्यात 50 पेक्षा जास्त अतिरेकी आणि त्यांच्या मदतीला आलेले पाकिस्तानी रेंजर्स मारले गेले होते. मेंढरमधील घटनेनंतर पाकिस्तान पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करण्याची मागणी होऊ लागली आहे. संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी सोमवारीच शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले जाईल. त्याची वेळ आणि जागा भारतीय सैन्य ठरवेल, असे सांगितले.

सीमारेषेवर भिंत बांधण्याबाबत
उरी हल्ल्यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी 2018 पर्यंत पाकिस्तानला लागून असलेली सीमारेषा बंद करण्याचे जाहीर केले होते. पण काही दिवसांनंतर पाक सीमेवर भिंत बांधणार नसल्याचे स्पष्ट केले. पाक सीमेेवर भिंत बांधण्याबाबत आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. पाक सीमारेषेवर ज्या ठिकाणी कुंपण घालण्यात आलेले नाही त्याठिकाणी, नदी, नाल्यांवर इलेक्ट्रॉनिक सर्विलॉन्स लावण्याच्या आदेश दिले आहे. याशिवाय कुंपण असूनही ज्याठिकाणी अतिरेक्यांची घुसखोरी होऊ शकेल अशा ठिकाणी अंडर ग्राऊंड सेंसर लावले जाणार आहेत. याशिवाय आवश्यक त्या ठिकाणी लेझर वॉल, इलेक्ट्रो ऑप्टिक सेंसर लावण्यात येणार आहेत. घुसखोरी रोखण्यासाठी मायक्रो अ‍ॅरो स्टेट बलूनही लावण्यात येतील.