पाकिस्तानी गायिका नाजिया हिने गायले मराठी चित्रपटातील गाण

0

मुंबई । संगीताला कोणतीच सीमा नसते, हेच खरे आहे. नाजियाचे देखिल हेच म्हणणे आहे. त्यामुळेच नाजियाने मराठीत सुप्रसिध्द असलेले जोगवा चित्रपटातील जीव रंगला हे गाणेस्वत:च्या आवाजात गायले आहे. इतकेच नाहीतर त्या मराठी गाण्याचा व्हिडिओदेखील तिने फेसबुक पेजवर व्हायरल केला आहे. हा व्हिडीओ अपलोड करताना नाजियानेदेखिल हेच म्हटले आहे की, संगीताची कोणतीही सीमा नसते.

कोण आहे नाजिया?
ती मुळची युएई देशातील आहे. नाजिया आमिन मोहंमद, असे तिचे नाव आहे. तसेच पाकिस्तानी गायिका म्हणूनही तिची ख्याती आहे. अजय-अतुलने संगीत दिलेले हे गाणे नाजियाला खूपच भावले. म्हणूनच तिने आपल्या फेसबुक पेजवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच तिने संगीतकार अजय-अतुल यांचेही विशेष कौतुक केले आहे.

सोशल मीडियातही प्रसिध्द आहे नाजिया
एक प्रसिध्द गायिका म्हणून नाजियाची आज ओळख आहे. ती सोशल मीडियावर आपले व्हिडिओ आणि फोटो कायमच शेअर करत असते. नाजियाने देशात आणि परदेशात राहणार्‍या आपल्या मराठी मित्र-मैत्रिणींसाठी जोगवा चित्रपटातील जीव रंगला या गाण्याचा व्हिडिओ बनवला आणि तो फेसबुकवर अपलोड केला आहे. हा व्हिडिओ एकाच दिवसात 4 हजार लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओमुळे नाजियाच्या फॅन फॉलोईंमध्येही प्रचंड वाढ झाली आहे. तसेच मराठी कलाकारांकडूनही नाजियाचे विशेष कौतुक केले जात आहे.

जोगवाची कहाणी
जोगवा या मराठी चित्रपटाला 2009 मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटात उपेंद्र लिमये आणि मुक्ता बर्वे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. देवदासी या प्रथेवर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात देवदासी होण्याची प्रक्रिया आणि त्यामुळे होणारे शोषण यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या चित्रपटातील अजय- अतुल यांनी संगीत दिलेले जीव रंगला हे गाणे तेव्हा प्रचंड गाजले होते. आजही हे गाणे लोकांना तेवढेच आवडते आहे. तर नाजियामुळे हे गाणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.