कराची: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने एका कार्यक्रमात पाकचा माजी फिरकीपटू गोलंदाज दानिश कनेरिया याच्यावर हिंदू असल्यामुळे चांगली वागणूक देत नसल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्याच्याबाबत अनेक चुकीच्या गोष्टी घडत गेल्या असेही अख्तरने खुलासा केला होता. यावर पाक संघाचे माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद यांनी अख्तरचे आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघात कधीही धर्मावरून पक्षपात केला जात नसल्याचा खुलासा त्यांनी केला.
‘पाकिस्तान अल्पसंख्याकांशी भेदभाव झाला असता तर हिंदू असलेला दानिश कनेरिया पाकिस्तान संघासाठी १० वर्षे खेळूच शकला नसता,’ असं मियाँदाद यांनी म्हटलं आहे. दानिश जेव्हा पाकिस्तानसाठी खेळत होता, तेव्हा निवड समितीकडं अनेक पर्याय होते. इम्रान ताहिर, अली हुसेन रिझवी, मन्सूर अमजद हे देखील चांगले गोलंदाज होते. तरीही दानिशची निवड झाली. त्यामुळं दानिशवर अन्याय झाला या आरोपात तथ्य नाही. पाकिस्तानी क्रिकेट संघात धर्मावरून कधीही पक्षपात झाला नाही,’ असं तो म्हणाला.
कनेरियानं केलेले आरोपही मियाँदाद यांनी खोडून काढले. ‘भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ज्याच्यावर क्रिकेटबंदी लादण्यात आली आहे, त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा? पैशासाठी तो काहीही बोलू शकतो. त्याची विश्वासार्हता तरी उरली आहे का,’ असा सवाल मियाँदाद यांनी केला. अख्तरने पाक संघाच्या खेळाडूंचे करिअर ड्रेसिंग रुममध्येच खराब केले जात असल्याचा आरोप लावला आहे. ज्याच्याशी संघातील खेळाडू कधी चांगले वागले नाहीत, त्या दानिशने आम्हाला कसोटी मालिका जिंकून दिली होती. असा खुलासा शोएब अख्तरने केला.