पाकिस्तानी सैनिकांचे तळ उद्ध्वस्त; दोन सैनिक ठार !

0

उरी: पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जाते. त्याला भारतीय सैनिक चोख प्रत्युत्तर देतात. हा प्रयत्न पुन्हा झाला असता भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या चौक्या उद्धवस्त केल्या असून, दोन पाकिस्तानी सैनिक देखील ठार झाले आहेत. जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून काल बुधवारी करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय जवान शहीद झाला होता. याशिवाय एका, स्थानिक महिलेचा देखील मृत्यू झाला होता. यानंतर भारताकडून पाकिस्तानला चोख प्रतित्त्युतर देण्यात आले.

पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील देवा सेक्टरमध्ये पाकिस्तानचे दोन जवान ठार झाले असल्याच्या वृत्तास पाकिस्तानी लष्करानेही मान्य केले आहे. भारतीय जवानांकडून उखळी तोफांचा मारा करण्यात आला होता. या अगोदर तंगधर आणि कंझलवान सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. ज्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले व दोन पाकिस्तानी सैनिकांना ठार करण्यात आले होते. भारतीय जवानांकडून करण्यात आलेल्या कारवाईत पाकिस्तानी सैनिकांचे एक तळ देखील उद्धवस्त झाले होते. जम्मू-काश्मीर भागातील एलओसीवर ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यात ९५० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली आहे. त्यांनी यावेळी हे देखील सांगितले की, भारतीय जवानांकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्यांना वेळोवेळी चोख प्रत्त्युत्तर देण्यात आलेले आहे.