कालका: काश्मीरसंदर्भात पाकने भारताशी चर्चा करावी अशी भूमिका अमेरिकेने मांडली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानशी जी चर्चा होईल ती पाक व्याप्त काश्मीरवर होईल असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ठणकावून सांगितले. कालका येथील प्रचारसभेमध्ये त्यांनी पाकिस्तानचा चांगलाच समाचार घेतला आहे. ‘ पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाला थारा देत राहील तोपर्यंत त्यांच्याशी कोणतीच चर्चा होणार नाही. येत्या काळात चर्चा झालीच तर ती पाक व्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावर होईल इतर कोणत्याही मुद्द्यावर होणार नाही’, असे राजनाथसिंह यांनी सांगितले.
आमचा पक्षाने घोषणापत्रात जी वचने दिली होती, ती सगळी पाळतो आहे. आम्ही कायम देशहिताची, देशनिर्मितीचे राजकारण करतो असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. बालाकोट एअर स्ट्राइकहूनही मोठा हल्ला भारत पाकव्याप्त काश्मीरमध्ये येत्या काळात करू शकतो असा इशाराही राजनाथसिंह यांनी यावेळी दिला आहे. कलम ३७०च्या मुद्द्यावरून पाकिस्तान जगभर फिरत आहे. अनेक देशांची मदत मागत आहे. पण कोणीच त्यांना मदत करत नाही असेही राजनाथसिंह यावेळी म्हणाले.